पानसरे-दाभोलकर प्रकरण आता एकाच खंडपीठाकडे
By Admin | Published: April 7, 2016 02:17 AM2016-04-07T02:17:34+5:302016-04-07T02:17:34+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या तपासासंबंधी त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिका व सामाजिक कार्यकर्ते
कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या तपासासंबंधी त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिका व सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेली याचिका आता एकाच खंडपीठासमोर चालणार आहे. पानसरे-दाभोलकर कुटुंबीयांतर्फे विधिज्ञ अभय नेवगी यांनी दिलेल्या अर्जावर बुधवारी हा निर्णय झाला. या तिन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी लवकर घ्यावी, यासाठी आज, गुरुवारी न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे.
दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांतर्फे या दोन्ही हत्यांचा तपास जलदगतीने व्हावा व त्यावर न्यायालयाचे नियंत्रण असावे यासाठी सुरुवातीला स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या; परंतु तपासात या दोन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने त्यांची एकत्रित सुनावणी सुरू झाली. केतन तिरोडकर यांनी पानसरे यांच्या हत्येचा तपास ‘सीबीआय’मार्फत व्हावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यात पानसरे कुटुंबीयांनीही आपल्याला म्हणणे मांडू द्यावे, अशी विनंती न्यायालयास यापूर्वीच केली आहे. (प्रतिनिधी)