पानसरे हत्येबाबत गुपचिळी!

By admin | Published: February 25, 2015 02:52 AM2015-02-25T02:52:20+5:302015-02-25T02:52:20+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अवाक्षरही काढण्यात आले नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना

Pansare murder case! | पानसरे हत्येबाबत गुपचिळी!

पानसरे हत्येबाबत गुपचिळी!

Next

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अवाक्षरही काढण्यात आले नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या भाजपा- शिवसेना युती सरकारने पानसरे यांच्याबाबत घेतलेल्या अळीमिळीगुपचिळीबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना एखादी मोठी घटना घडली तर तत्कालीन गृहमंत्री  आर. आर. पाटील हे स्वत:हून घटनेबाबत मंत्रिमंडळाला माहिती देत. नारायण राणे, छगन भुजबळ, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री घटनेबाबत तपास कोणत्या दिशेने सुरु आहे, तपासात कोणत्या त्रुटी दिसत आहेत, याचा ऊहापोह करीत. मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान व डान्सबार बंदी या निर्णयांचे कौतुक करण्यात आले. मात्र, कॉम्रेड पानसरे यांच्याबाबत ब्र शब्दही उच्चारण्यात आला नाही. गृहखात्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री फडणवीस यांना पानसरे यांच्या हत्येचा तपास कुठवर आला हेसुद्धा मंत्रिमंडळाला सांगावे असे वाटले नाही. तर दुसरीकडे याच मुद्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या सुभाष देसाई, दिवाकर रावते यासारख्या मंत्र्यांना पानसरे हत्येबाबत विचारावे वाटले नाही ,याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Pansare murder case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.