पानसरे हत्या प्रकरण, समीर गायकवाडला हवे सनातनचे ‘गोमूत्र’
By admin | Published: February 6, 2017 07:57 PM2017-02-06T19:57:59+5:302017-02-06T19:57:59+5:30
संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला सुरक्षेअभावी सोमवारी न्यायालयात हजर करण्यास कारागृह अधीक्षकांनी असमर्थता दर्शविली.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 6 - ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला सुरक्षेअभावी सोमवारी न्यायालयात हजर करण्यास कारागृह अधीक्षकांनी असमर्थता दर्शविली. संशयित आरोपी समीर गायकवाड याला ‘सनातन’चे गोमूत्र आणि अगरबत्ती देण्याची त्याच्या वकिलांची मागणी न्यायाधीशांनी फेटाळली. त्यास फक्त जपमाळ देण्यासच परवानगी देण्यात आली. याबाबतची पुढील सुनावणी दि. २८ फेब्रुवारीला होणार आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर ही येथील न्यायसंकुलामध्ये सुनावणी सुरू आहे. दुपारी तीनच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली.
तत्पूर्वी सकाळी तपासी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या खटल्यातील तपासासंदर्भातील अहवाल व संशयित आरोपींच्या वकिलांच्या मागणी अर्जावरील आक्षेपाचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीत पोलीस बंदोबस्त पुरविल्यामुळे संशयित आरोपीला पोलीस बंदोबस्त मिळणार नसल्याने पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे अपुऱ्या पोलीस बंदोबस्ताअभावी समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे यांना न्यायालयात हजर करू शकत नसल्याचेही कारण न्यायालयास सांगितले. आरोपीच्या वकिलांनी समीर गायकवाड याला पोटविकाराचा त्रास असल्याने प्रभावी औषध म्हणून ‘सनातन’चे गोमूत्र, ध्यानधारणेसाठी अगरबत्ती आणि जपमाळ देण्याची मागणी केली. या मागणीवर सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी आक्षेप नोंदवला. या वस्तू प्रयोगशाळेतून रासायनिक पृथक्करणानंतरच देण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
जपमाळ देण्याबाबत मात्र राणे यांनी सहमती दर्शविली. अचानक पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्याने संशयित आरोपीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची मागणी करता आली नसल्याचे कारागृह अधीक्षक शेळके यांनी सांगितले; पण डॉ. वीरेंद्र तावडेला न्यायालयात हजर करता येत नसेल तर किमान आठ दिवस अगोदर व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी न्यायालयात अर्ज करावा, असेही न्यायाधीशांनी सुनावले.
समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांच्याबाबत न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अॅड. गोविंद पानसरे यांची बँक खाती व झालेल्या पत्रव्यवहाराची पुढील सुनावणीवेळी मागणी करणार असल्याचे आरोपींचे वकील अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. न्यायालयात सादर झालेल्या आरोपपत्रात, अॅड. पानसरे हे सोशीत आणि पीडितांसाठी काम करत होते, असे म्हटले आहे,
त्यामुळे त्यांच्याकडून काही जण दुखावले गेल्याची शक्यता आहे, त्यातूनच काही दुखावले गेलेल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी कागदपत्रे मागणीचा अर्ज देणार असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. समीर गायकवाडचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी ‘सनातन’चे गोमूत्र, अगरबत्ती व जपमाळ देण्याची मागणी केली; पण या वस्तू कारागृहाच्या नियमात बसत नसल्याचे सांगून कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी कोणत्या कंपनीच्या कोणत्या वस्तू देता येतात याची यादीच वाचून दाखविली. साहित्य न्यायालयात हजर संशयिताचे वकील समीर पटवर्धन यांनी गायकवाड याच्या मागणीनुसार सनातन कंपनीचे गोमूत्र, अगरबत्ती व जपमाळ देण्यासाठी न्यायाधीशांसमोर हजर केली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्या वस्तूंची पाहणी करत जपमाळ वगळता दोन्हीही वस्तूंचा रासायनिक पृथक्करणानंतर विचार करू, असे न्यायाधीशांनी सांगितले. उच्च न्यायालयात आज सुनावणी समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यावर आरोपनिश्चिती संदर्भात उच्च न्यायालयात स्थगिती आहे. त्याबाबत आज, मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.