पारवडीला बिबट्याचा धुमाकूळ

By admin | Published: October 18, 2015 02:56 AM2015-10-18T02:56:01+5:302015-10-18T02:56:01+5:30

शेळीला मारण्यासाठी आलेल्या बिबट्याने पारवडी आळे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील थोरातमळा येथे आज अक्षरश: धुमाकूळ घातला. शेळीच्या पाठलागामध्ये विहिरीत

Panther leopard | पारवडीला बिबट्याचा धुमाकूळ

पारवडीला बिबट्याचा धुमाकूळ

Next

बेल्हा : शेळीला मारण्यासाठी आलेल्या बिबट्याने पारवडी आळे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील थोरातमळा येथे आज अक्षरश: धुमाकूळ घातला. शेळीच्या पाठलागामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढताना त्याने वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला जखमी केले व धूम ठोकली. परंतु, त्यानंतर पळताना हा बिबट्या पुन्हा दुसऱ्या विहिरीत पडला. अखेरीस या बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
बेल्हा (ता. जुन्नर) येथून जवळच असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील पारवडी या गावात शुक्रवारी रात्री बिबट्या एका शेळीच्या मागे धावत होता. करडासह बिबट्या विहिरीत पडला; मात्र आज सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या साह्याने कॉट टाकून त्याला वर काढले. परंतु, बिबट्याने वर येताच एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला केला व त्याला जखमी केले. यातून सुटून त्याने धूम ठोकली. मात्र, हा बिबट्या फार दूर पळून जाऊ शकला नाही. तो पुन्हा जवळच्याच दुसऱ्या विहिरीत पडला. अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीला पिंजरा बांधून विहिरीत सोडला व सायंकाळी ६ च्या सुमारास या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
भाऊसाहेब थोरात यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला. सकाळी करडू सापडत नाही म्हणून ग्रामस्थांनी शोध घेतला असता, ते विहिरीत मरून पडलेले दिसले व जवळच बिबट्या दिसला. त्यांनी ताबडतोब पारनेरच्या वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी या ठिकाणी पाहणी करून विहिरीत पडलेला बिबट्याला काढण्यासाठी कॉट टाकली. तिला चारही बाजूंना ग्रामस्थ व वन कर्मचारी यांनी धरले. बिबट्या कॉटवर आला व सर्वांनी कॉट वर ओढली. जवळच पिंजराही ठेवला होता. मात्र, हा बिबट्या पिंजऱ्यात गेलाच नाही. तो सरळ उडी मारून पळाला. या वेळी वनरक्षक बी. ए. चव्हाण बिबट्याने उडी मारल्यामुळे हाताला लागून जखमी झाले. त्यानंतर संदीप थोरात यांच्या विहिरीत हा बिबट्या पुन्हा पडला. तेथे बघ्यांची मोठी गर्दी
झाली होती. (वार्ताहर)

बिबट्याशी झुंज देणाऱ्या ‘पांडा’चे निधन
निमगाव सावा : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील शेतकरी सोपान श्रीपती गाडगे यांच्या पांडा नावाच्या कुत्र्याचे निधन झाल्याने सर्व गाव शोकाकुल झाले आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी पांडाने बिबट्याशी झुंज देऊन अनेक ग्रामस्थांचे प्राण वाचविले होते.

गावात बिबट्या आल्याने ग्रामस्थ जमा झाले. बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केला. अशा परिस्थितीत पांडा बिबट्याशी लढला. प्रत्येक वेळी पांडाने बिबट्याशी झुंज दिली. सुमारे १० ते १५ हल्लाग्रस्त ग्रामस्थांचे प्राण वाचविले. अखेर ग्रामस्थांनी या बिबट्याला जेरबंद केले व वन विभागाच्या स्वाधीन केले होते.

हा कुत्रा एवढा इमानी आणि शहाणा होता, की एकदा घरी आलेली व्यक्ती पुन्हा खूप वर्षांनी घरी आली, तरी पांडा कधी भुंकतही नसे. अशा या पांडा श्वानाचे अखेर निधन झाले. १६ वर्षांच्या आयुष्यात त्याने आपल्या मालकावरील व ग्रामस्थांवरील हिंस्र श्वापदांची अनेक संकटे परतवून
लावली होती.

Web Title: Panther leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.