पनवेल आरटीओने रसायनीत शोधली जागा

By admin | Published: April 8, 2017 03:37 AM2017-04-08T03:37:23+5:302017-04-08T03:37:23+5:30

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सिडकोने करंजाडे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे.

Panvel detection of chemical substances by RTO | पनवेल आरटीओने रसायनीत शोधली जागा

पनवेल आरटीओने रसायनीत शोधली जागा

Next

अरूणकुमार मेहत्रे,
कळंबोली- स्टील मार्केटमध्ये भाडोत्री जागेवर असलेले पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सिडकोने करंजाडे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र हा भूखंड अपुरा पडत असल्याने परिवहन विभागाने रसायनी येथे जागा शोधली आहे. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातही शासकीय जागेचा शोध सुरू आहे. सर्व सुविधा निर्माण करण्याकरिता कमीत कमी तेरा एकर जागेची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
पनवेल परिसराचा वाढता विस्तारामुळे ठाणे परिवहन आणि पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर ताण पडत होता. स्थानिकांच्या मागणीनुसार राज्य परिवहन विभागाने नोव्हेंबर २०१० मध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विभाजन करून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले. त्याचबरोबर पेण कार्यालयावरील ताण कमी करण्याकरिता पनवेल, कर्जत, खालापूर या तालुक्यांकरिता पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आहे. सुरुवातीला कर्नाळा स्पोटर््स अकादमी संकुलात कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र वाढती गर्दी पाहता एक कॅम्प अकादमी परिसरात ठेवून कळंबोली स्टील मार्केटमध्ये कार्यालय हलविण्यात आले. अवजड वाहनांच्या गर्दीमुळे याठिकाणचीही जागा अपुरी पडू लागली. सर्वात मोठी अडचण म्हणजे चालकांची चाचणी घेण्याकरिता आणि वाहनांची तपासणीसाठी स्टील मार्केटमध्ये जागाच नाही. म्हणून पनवेल आरटीओ कार्यालयाला हक्काची आणि विस्तीर्ण जागा असावी याकरिता सहा सात वर्षापासून परिवहन विभागाकडून सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर सिडकोने सकारात्मक भूमिका घेत करंजाडे येथे २३,७६३ चौरस मीटरचा भूखंड आरटीओ कार्यालयाला दिला आहे. २.५ हेक्टर क्षेत्रावर ३,५९० चौमी जागेवर बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. तळमजला अधिक चार अशी इमारत या ठिकाणी उभारण्यात नियोजन आहे. परंतु वाहनांची तपासणी त्याचबरोबर चालकांना प्रशिक्षण देण्याकरिता ट्रेकिंग ट्रॅक उभारण्यासाठी हा भूखंड अपुरा पडत असल्याने परिवहन विभाग पनवेल परिसरात दुसरी जागा शोधत आहे. मात्र अपेक्षित जागा मिळणे कठीण झाल्याने रसायनी विभागात जागा शोधली आहे.
वाया गावात शासकीय जागा
रसायनीजवळ वाया गावात पंचवीस एकर एकसंघ शासकीय जागा आहे. त्यापैकी तेरा एकर जागेची परिवहन विभागाने मागणी केली आहे. त्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाची आवश्यकता आहे. मात्र ग्रामस्थांनी आगोदर आमचे गावठाण निश्चित करा, अशी भूमिका घेतली आहे.
सिडकोने करंजाडे येथे जो भूखंड दिला आहे ते क्षेत्रफळ कमी पडत आहे. कमीत कमी तेरा एकर जागेची गरज आहे. त्यानुसार रसायनीतील वाया गावात जागा सुध्दा शोधली आहे. मात्र अजूनही पनवेल परिसरात भूखंड मिळावा, या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत.
- अनंत पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
पनवेल
२५० मीटरचा
ट्रेकिंग ट्रॅक
पनवेल आरटीओ वाहनांची चाचणी, प्रशिक्षण घेण्याकरीता २५० मीटर लांबीचा ट्रेकिंग ट्रॅक तयार करणार आहे. त्यामुळे करंजाडे येथील भूखंड तुलनेत कमी पडत आहे. वाहनांची पार्किंग तसेच ते वळविण्यासाठी मुबलक जागा आवश्यक आहे. त्यामुळे परिवहन विभाग मोठी जागा शोधत आहे.

Web Title: Panvel detection of chemical substances by RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.