पनवेल : आश्रमशाळेच्या वसतिगृहात स्लॅब कोसळून आठ विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 05:01 IST2017-10-13T05:00:39+5:302017-10-13T05:01:05+5:30
पनवेल तालुक्यातील चिखले गावात असलेल्या अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पहाटे अचानक स्लॅब कोसळला.

पनवेल : आश्रमशाळेच्या वसतिगृहात स्लॅब कोसळून आठ विद्यार्थी जखमी
पनवेल : पनवेल तालुक्यातील चिखले गावात असलेल्या अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पहाटे अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आठ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने कामोठा येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली.
चिखले गावातील या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतची ५४४ मुले-मुली शिक्षण घेतात. बुधवारी रात्री मनोरंजन हॉलमध्ये ४५ मुले झोपली होती. पहाटे दीडच्या सुमारास अचानकपणे छताचे प्लॅस्टर पडल्याने आठ मुले जखमी झाली. सोनू निरगुडा (१३, सातवी), दिनेश आव्हाडे (१५, सातवी), युवराज मदे (१०, पाचवी), भुमराज चौधरी (१२, सातवी), मोहन मदे (१३, सातवी), मयूर खंडवी (१६, दहावी), राजवीर मदे (७, पहिली), विलास उघडे (१४, सातवी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीला, डोक्याला, हाताला, पायाला जखमा झाल्या आहेत. यामध्ये मयूर खंडवीच्या हाताला गंभीर दुखापत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पालकांनी वसतिगृहात धाव घेतली व तातडीने एमजीएम गाठले. याची पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद केली असून, वपोनि मालोजी शिंदे यांनी आश्रमशाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. येथील वर्गाच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वीच पत्र दिल्याची माहिती येथील शाळेकडून मिळाली आहे.