पनवेल महापालिका १ आॅक्टोबरपासून
By Admin | Published: September 28, 2016 05:24 AM2016-09-28T05:24:45+5:302016-09-28T05:24:45+5:30
येत्या १ आॅक्टोबरपासून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येणार असून, तशी अधिसूचना नगरविकास खात्याने काढली आहे. पनवेल नगरपालिका क्षेत्रासह
- नितीन देशमुख, पनवेल
येत्या १ आॅक्टोबरपासून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येणार असून, तशी अधिसूचना नगरविकास खात्याने काढली आहे. पनवेल नगरपालिका क्षेत्रासह २९ गावांचा नव्या महापालिकेत समावेश करण्यात आला असून नैना क्षेत्रातील गावे मात्र वगळण्यात आली आहेत. १ आॅक्टोबरला पनवेल महानगरपालिकेची स्थापना होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने याआधीच प्रसिद्ध केले होते.
नगरविकास खात्याने सोमवारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार ही अधिसूचना काढली आहे. त्यानुसार १ आॅक्टोबरपासून महानगरपालिका अस्तित्वात येईल, असे जाहीर केल्यामुळे या महापालिकेबाबतचा पनवेलकरांचा संभ्रम संपला आहे. महापालिकेत पनवेल नगरपालिका क्षेत्रासह, तळोजे पाचनंद, काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचा पाडा, कामोठे, चाळ, नावडे, तोंढरे, पेंढर, कळंबोली, रोडपाली, खिडुकपाडा, पडघे, वळवली, पाले खुर्द, टेंभोडे, आसूडगाव, बिड, आडीवली, रोहिंजण, धानसर, पिसार्वे, तुर्भे, करवले बुद्रुक, नागझरी, तळोजे मजकूर, घोट, कोयनावेळे यांचा समावेश करण्यात आला आहे.
पनवेलमध्ये गट, गण पूर्वीइतकेच
प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेवर शासनाने सोमवारी रात्री अधिसूचना जारी करून अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नव्याने निर्माण झालेले सहा गट कमी होणार आहेत. पनवेल तालुका पंचायत समितीचे गण कमी होणार आहेत. तरीसुद्धा संख्याबळ पूर्वीइतकेच राहणार आहे. गेल्या १० वर्षांत पनवेल, सिडको वसाहती आणि आजूबाजूच्या गावांतील लोकसंख्या कमालीची वाढली आहे.
महानगरपालिका व्हावी, यासाठी मी खासदार असल्यापासूनच चर्चा सुरू केली होती. शहराच्या विकासासाठी ते गरजेचे होते. मात्र काही जणांकडून राजकारणासाठी नागरिकांच्या मनात भीती निर्माण करून संभ्रम निर्माण केला जात होता. महापालिकेच्या स्थापनेमुळे पनवेलच्या विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत.
- रामशेठ ठाकूर, माजी खासदार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने पनवेल महानगरपालिका होण्याचे स्वप्न साकार होत आहे. गेल्या २५ वर्षांपासून नागरिकांची महापालिकेची मागणी होती. नैना प्रकल्प व रेल्वेच्या प्रकल्पांमुळे पनवेल महानगरपालिका होणे गरजेचे होते. पनवेलच्या विकासातील अडचणी आता दूर होतील.
- चारु शीला घरत, नगराध्यक्षा, पनवेल
आम्ही अनेक वर्षे सिडकोत कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करीत आहोत. आता आम्हाला महानगरपालिकेत सामावून घेतल्यास बरे होईल.
- गणपत गायकवाड, कर्मचारी
विकासासाठी पनवेल महानगरपालिका होणे चांगले आहे. पण सिडकोत पाणीपट्टी कमी आहे. इतर कर कमी आहेत, महापालिका झाल्यावरही हे कर आहे तसेच राहावेत.
- डी. के. मगर, ज्येष्ठ नागरिक