इबोला संशयितामुळे पनवेलमध्ये खळबळ
By admin | Published: November 5, 2014 04:25 AM2014-11-05T04:25:15+5:302014-11-05T04:25:15+5:30
नायजेरियात इबोलासारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने सर्वत्र भितीचे वातावरण असताना नायजेरियावरून मुंबई विमानतळावर आलेला इबोलाचा संशयित रुग्ण हा पनवेलचा असल्याचे समोर आले
वैभव गायकर, नवी मुंबई
नायजेरियात इबोलासारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने सर्वत्र भितीचे वातावरण असताना नायजेरियावरून मुंबई विमानतळावर आलेला इबोलाचा संशयित रुग्ण हा पनवेलचा असल्याचे समोर आले आणि पनवेल आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र नंतर तो तामिळनाडूचा असल्याचे स्पष्ट झाले.
सिंगा रोयन अँटनी अँडीकोस्टा हा दोन दिवसांपूर्वी नायजेरियावरून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. तो इबोलाचा संशयित रुग्ण असल्याचे आणि त्याच्या पासपोर्टवर विस्राली नाका, ३०२/५ एवढाच पत्ता असल्याचे निदर्शनास आले.
हा पत्ता पनवेलचा असल्यामुळे त्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, अलिबाग यांना देण्यात आली. ही माहिती पनवेल ग्रामीण रुग्णालयाला मिळताच आरोग्य विभाग जागा झाला व संशयितांची शोधाशोध सुरू केली, मात्र ही व्यक्ती पनवेलला आलीच नसल्याचे समोर आले. शिवाय अँडिकोस्टा यांनी आपण मूळगावी तामीळनाडूला गेल्याचे पनवेलमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र या प्रकारामुळे पनवेलमध्ये खळबळ उडाली.