पनवेलच्या महापौरपदी कविता चौतमोल बिनविरोध
By admin | Published: July 11, 2017 03:31 AM2017-07-11T03:31:01+5:302017-07-11T03:31:01+5:30
पनवेल शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमोल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमोल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची घोषणा पीठासन अधिकाऱ्यांनी केली. पनवेल महापालिकेच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या पहिल्या विशेष महासभेत ही घोषणा करण्यात आली. शेकापच्या महापौरपदाच्या उमेदवार हेमलता गोवारी व उपमहापौरपदाचे उमेदवार रवींद्र भगत यांनी उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले.
स्थायी समिती व स्वीकृत सदस्यांची घोषणाही सभागृहात करण्यात आली. भाजपाच्या वतीने तीन जणांचे अर्ज स्वीकृत नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, विजय चिखलेकर यांचा समावेश होता. तिघांचेही अर्ज पात्र झाल्याने तिघांच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ पडली तर शेकापच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये गुरुनाथ गायकर, बाळाराम पाटील, प्रमोद भगत, गणेश कडू यांचा समावेश होता. मात्र चारपैकी दोन जागेवर स्वीकृत नगरसेवक निवडता येणार होते. पैकी बाळाराम पाटील यांचा अर्ज अपात्र ठरल्याने तीन जणांमध्ये पक्षांतर्गत लढाई होती. शेकाप गटनेते प्रीतम म्हात्रे यांनी अखेर दोन नावे पीठासन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याने गुरुनाथ गायकर व प्रमोद भगत यांची निवड करण्यात आली. पालिकेच्या एकूण ७८ नगरसेवकांपैकी भाजपाचे ५१ तर शेकाप महाआघाडीचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी भाजपाचे सर्व ५१ जण सभागृहात उपस्थित होते, तर शेकापच्या २३ पैकी अरविंद म्हात्रे या वेळी अनुपस्थित होते. ७८ नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार १६ सदस्य स्थायी समितीवर जाणार होते. त्यापैकी पक्षीय बलाबल पाहत भाजपाचे १० तर शेकापचे ६ सदस्य स्थायी समितीवर नेमण्यात आले. पीठासन अधिकारी पी. डी. मलिकनेर, उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले.
पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना श्रेय देत आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करेन. सर्व निर्वाचित नगरसेवकांनी पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे.
- डॉ. कविता चौतमोल
पनवेल शहर महानगरपालिका १ आॅक्टोबर २०१६ रोजी अस्तित्वात आली. महापालिकेची ही पहिलीच ऐतिहासिक महासभा असून महापौर यांच्यावर महापालिका क्षेत्रातील नागरिक त्यांच्या समस्या, परिसराच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यात पनवेलला अव्वल बनविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
- परेश ठाकूर, भाजपा गटनेते
स्वीकृत सदस्य
भाजपा : नितीन पाटील,
अनिल भगत, विजय चिखलेकर
शेकाप : गुरु नाथ गायकर, प्रमोद भगत
स्थायी समिती
सदस्य
भाजपा : परेश ठाकूर, संतोष भोईर, नेत्रा पाटील, रामजी गेला बेरा, अमर पाटील, गोपीनाथ भगत, कुसुम म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजय भोपी, तेजस कांडपिळे.
शेकाप आघाडी : प्रीतम म्हात्रे, सुरेखा मोहोकर, भारती चौधरी, हरेश केणी, गोपाळ भगत, रूपेश पाटील.