बाप्पांचा गजर आता चार रात्री १२ पर्यंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2016 04:52 AM2016-09-06T04:52:02+5:302016-09-06T04:52:02+5:30

विघ्नहारी, विघ्नहर्ता गणपती बाप्पा मोठ्या उत्साहात विराजमान झाले

Papa's alarm for up to four nights! | बाप्पांचा गजर आता चार रात्री १२ पर्यंत!

बाप्पांचा गजर आता चार रात्री १२ पर्यंत!

Next


मुंबई : विघ्नहारी, विघ्नहर्ता गणपती बाप्पा मोठ्या उत्साहात विराजमान झाले असून, गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी गणेशोत्सवातील चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ‘आवाजा’ची मुभा पर्यावरण विभागाने दिली आहे.
वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुका, ढोल-ताशे-लेझीमसह पारंपरिक वाद्यांचा निनाद, टाळ-मृदंगाचा गजर यामुळे अवघे वातावरण भक्तीरसपूर्ण होते. गणपती माझा नाचत आाला...असेच चित्र सर्वत्र असल्याने आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. दहा दिवस मोरयाचा गजर आसमंत व्यापून राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात आज मंगळवार, पाचवा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशीला रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. पर्यावरण विभागाने सोमवारी या संबंधीचे परिपत्रक काढले. एरवी रात्री १० पर्यंतच ध्वनिक्षेपणाची परवानगी असते. ही परवानगी वर्षभरात १५ दिवस रात्री १२ पर्यंत विविध कार्यक्रमांसाठी देता येते. हे दिवस कोणते असावेत याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, गणेशोत्सव काळात चार दिवस रात्री १२ पर्यंत ही मुभा देण्याचा निर्णय राज्याच्या पर्यावरण विभागाने घेतला.
नवरात्र उत्सव काळात दोन दिवस (अष्टमी आणि नवमी) ही परवानगी देण्यात आली आहे. या शिवाय, दिवाळीत एक दिवस, ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरला ‘ईअर एन्ड’ निमित्ताने देखील अशी मुभा देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
>डॉल्बीतून मुक्तता
गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आल्याचे चित्र पाहायला मिळाले. आरोग्याला हानीकारक डॉल्बीच्या ठणठणातून मुक्तता झाल्याने नागरिकांनीही आनंद व्यक्त केला. विसर्जन मिरवणूकही पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरी व्हावी, अशी आशाही अनेकांनी बोलून दाखविली.
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मानल्या जाणाऱ्या किंग सर्कल येथील ‘जीएसबी गणेशा’च्या दर्शनासाठी सोमवारी पहिल्याचा दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ३१५ किलो चांदी आणि ६८ किलो सोन्याच्या दागिन्यांनी येथील गणेश मूर्ती सजविण्यात येते.
>शाडूच्या मूर्तींची संख्या यंदा दुप्पट
मुंबईतील उंचच उंच मूर्तींच्या मिरवणुका निघाल्या होत्या. पुण्यात मानाच्या गणपतींची शाही मिरवणूक निघाली होती.
वेगवेगळ््या देवदेवतांच्या रूपातील गणपती, अगदी बाजीरावाच्या पेहेरावातील मूर्ती हे यंदाच्या मूर्तींमधील आकर्षण ठरले आहे. पर्यावरणविषयक जागृतीमुळे शाडूच्या मूर्तींची संख्याही यंदा जवळपास दुप्पट झाली आहे.
>मुंबईत सिद्धिविनायक मंदिरातही दर्शनासाठी गर्दी झाली होती. अनेक हिंदी-मराठी सेलिब्रेटींच्या घरीही लाडक्या बाप्पाचे थाटात आगमन झाले. गणेशाच्या आगमनासाठी राज्यात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक मार्गावर पोलिसांची विशेष नजर होती.

Web Title: Papa's alarm for up to four nights!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.