प. बंगालमधील वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर?
By admin | Published: May 13, 2014 04:31 AM2014-05-13T04:31:55+5:302014-05-13T04:31:55+5:30
पश्चिम बंगालात वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कुणासाठी लाभदायी ठरतो याबद्दल येथे मोठी उत्सुकता आहे.
किरण अग्रवाल, कोलकाता राज्यातील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातील वाक्युद्धाने तापलेल्या पश्चिम बंगालात वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कुणासाठी लाभदायी ठरतो याबद्दल येथे मोठी उत्सुकता आहे. राज्यात यंदा विक्रमी मतदान झाले. प. बंगालात मतदानाचा शेवटचा टप्पा आज पार पडला, यात ८० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी झालेल्या चार चरणांतही मतदानाची सरासरी ८१ टक्क्यांनी इतकी राहिली जी गेल्या २००९ च्या निवडणुकीपेक्षा दीड ते दोनने जास्त आहे. अर्थात, यंदाच्या मतदानात मतदान केंद्र बळकाविणे व बोगस मतदानाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आरोप भाजपा व डाव्यांतर्फे करण्यात आले असून, तशा लेखी तक्रारीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार राज्यात निवडणूक हिंसाचाराच्या सुमारे एक हजारांहून अधिक घटना घडल्या असून, त्यात आठ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर ९५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आजच्या मतदानाप्रसंगी उत्तर २४ परगणा परिसरातील हाडवा येथे तृणमूल व डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोळीबारात चार गंभीर व १७ जखमी झाले आहेत. नक्षलवादी भाग म्हणून ओळखल्या जाणार्या झाडग्राम मधील गोयीबल्लभपूर येथे चौथ्या चरणांत झालेल्या मतदानानंतर हिंसाचार होऊन तीन लोक गंभीर जखमी झाले. तेथे १२ घरांची तोडफोड करण्यात आली. भाकपाच्या मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रातून काढून दिल्यानंतर ही घटना घडली होती. राज्यातील निवडणूक मैदान यंदा ममता दीदी व मोदी यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी गाजले. गुजरातचे कसाई, कागदी वाघ व दंगेखोर म्हणून मोदींना संबोधत त्यांना बेड्या घालून जेलमध्ये डांबण्याची भाषा तृणमूलतर्फे केली गेली, तर ‘वेड्यांसाठी वापरल्या जाणार्या दोरीतही तुम्ही भ्रष्टाचार कराल, त्यापेक्षा सांगाल, त्या जेलमध्ये मीच जाऊन बसतो’, असे म्हणत मोदींनी तृणमूलच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. बांगलादेशी घुसखोर व शरणार्थी, मूळ बंगाली व बंगाल बाहेरून आलेले हिंदी भाषिक तसेच मतुआ नागरिकांचे अधिकार अशा धार्मिक जातीय व प्रांतवादी मुद्याखेरीज राज्यातील शारदा चिटफंड घोटाळ्यासारख्या विषयांवर आरोप-प्रत्यारोपांचे बार भरले गेले. गेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकांत तृणमूल व काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीने लढले होते. तेव्हा दुसर्या स्थानी डावे होते. भाजपाच्या पदरात अवघी एकच जागा होती, तर संपूर्ण राज्यात भाजपाला अवघ्या ४ ते ४.५० टक्के प्रमाणात मते मिळाली होती. यंदा ‘मोदी फॅक्टर’ मुळे हे प्रमाण वाढणार असले तरी ते विजयाप्रत उंचावलेल का, हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. तृणमूल व काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्याने त्यांच्यात होणारे मतविभाजन भाजपाच्या पथ्यावर पडते की डाव्यांच्या; हादेखील प्रश्न आहे, ज्याचे उत्तर आणखी चार दिवसांनी मिळेल.