प. रेल्वेवर नव्या फे-या नाहीत
By admin | Published: July 18, 2014 03:07 AM2014-07-18T03:07:45+5:302014-07-18T03:07:45+5:30
रेल्वे अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प उपनगरीय लोकल प्रवाशांच्या माथी मारण्याचे काम रेल्वेने केलेले असतानाच आता आणखी एक संकट पश्चिम रेल्वे प्रवाशांवर ओढवले आहे
मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प उपनगरीय लोकल प्रवाशांच्या माथी मारण्याचे काम रेल्वेने केलेले असतानाच आता आणखी एक संकट पश्चिम रेल्वे प्रवाशांवर ओढवले आहे. यापूर्वीच भरमसाठ वाढलेल्या लोकल फेऱ्या आणि आणखी फेऱ्या चालवण्यासाठी नसलेली क्षमता पाहता यापुढे नवीन लोकल फेऱ्या वाढवणे अशक्य असल्याचे पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले. त्यामुळे नवीन फेऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प आणि पश्चिम रेल्वेवर येणाऱ्या तसेच सुरू असणाऱ्या प्रकल्पांविषयी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती समोर आणली. मागील सहा वर्षांत पश्चिम रेल्वेमार्गावर ९ डब्यांच्या लोकल १२ डब्यांच्या करण्यात आल्या. तसेच १२ डब्यांच्या लोकल आता १५ डबाही करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढली असून, गर्दीतला प्रवास कमी झालेला आहे. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या १,३00 फेऱ्या होत असून, या फेऱ्यांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होणे अशक्य आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची माहिती त्यांनी दिली. पाच मिनिटांच्या फरकाने सध्या ९२ ते ९३ टक्के लोकल धावत असून, हे पाहता फेऱ्या वाढवणार कशा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हार्बर रेल्वेचा विस्तार गोरेगावपर्यंत झाल्यावर सुसूत्रता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)