प्राध्यापक नीरज हातेकर यांनी जाहीर केली स्वेच्छा निवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 12:42 PM2017-07-31T12:42:24+5:302017-07-31T12:47:16+5:30
मुंबई, दि. 31- परीक्षांचे रखडलेले निकाल जाहीर करण्याची 31 जुलैची डेडलाइन गाठण्याचे मुंबई विद्यापीठाकडून प्रयत्न होत असताना, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी विद्यापीठ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख नीरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील समस्या म्हणजे, 'उपयोगात न येणारा निराशाजनक लढा,' असं म्हणत नीरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली आहे.
मुंबई विद्यापाठीतील अनेक मुद्द्यांवर विद्यापीठाच्या बाजूने बोलणारे तसंच वेळप्रसंगी विद्यापीठाच्याविरूद्ध बोलणारे, अशी नीरज हातेकर यांची ओळख आहे. सोमवारी सकाळी नीरज हातेकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. 'निराशाजनक आणि बेपर्वा विद्यापीठाचा भाग असण्यापेक्षा विद्यापीठाच्या बाहेर राहून मी विद्यापीठाच्या हिताचं काम करू शकतो, याची मला जाणीव झाली आहे. दररोज अशा प्रणालीचा आदर करताना अस्वस्थ वाटत असल्याचं हातेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
'मुंबई विद्यापीठात सध्या जे काही चाललं आहे, ते अत्यंत त्रासदायक आहे आणि विद्यापीठाने एकत्र येऊन आता काम करावं, अशी वेळ आली आहे. शांत बसण्याची वेळ आता संपली आहे. असंही नीरज हातेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
मुंबई विद्यापीठाचे 153 परीक्षांचे निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाचे 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. 90 टक्के मूल्यांकन पूर्ण झाल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. पण ३० जुलैच्या रात्रीपर्यंत विद्यापीठाने केवळ १५३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केल्याने तब्बल ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल शिल्लक आहेत. तसंच सव्वातीन लाख उत्तरपत्रिका अजूनही तपासलेल्या नाहीत. आतापर्यंत विद्यापीठाने कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केलं आहे. पण आता एका दिवसात सव्वातीन लाख उत्तरपत्रिका तपासून ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करणे हे अशक्यप्रायच असल्याने मुंबई विद्यापीठाला देण्यात आलेली डेडलाइन चुकल्याचंच स्पष्ट होत आहे.
विद्यापीठाने प्राध्यापकांना रविवारीही उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी बोलावले होते. पण रविवार असल्यामुळे जवळपास ५ हजारांपैकी फक्त ९३९ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीला आले. प्राध्यापकांची संख्या रोडावल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा वेग रविवारी मंदावला होता. फक्त २४ हजार ३४९ उत्तरपत्रिकांची तपासणी रविवारी पूर्ण झाली. त्यामुळे अजूनही सुमारे ३ लाख २५ हजार १९५ उत्तरपत्रिकांची तपासणी होणे बाकी आहे. १ लाख २५ हजार ३५७ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशनही अजून झालेले नाही. तपासणी बाकी असलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये २ लाख ६३ हजार ८१५ उत्तरपत्रिका या वाणिज्य शाखेच्या असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाने अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या वाणिज्य आणि कला शाखेचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. तसेच विधिचा निकालही लागलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून विज्ञान शाखेचा निकाल जाहीर करणार असल्याचे विद्यापीठ सांगत असूनही रविवारी रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. निकालाच्या डेडलाइनला शेवटचे दोन दिवस उरले असताना, शनिवार आणि रविवारी मिळून फक्त छोट्या अभ्यासक्रमांचे निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहेत.