विस्थापित प्राण्यांचा स्वर्ग..!

By admin | Published: July 8, 2017 11:45 PM2017-07-08T23:45:08+5:302017-07-08T23:46:34+5:30

- जागर - रविवार विशेष

The paradise of displaced animals ..! | विस्थापित प्राण्यांचा स्वर्ग..!

विस्थापित प्राण्यांचा स्वर्ग..!

Next

गोसंरक्षणाच्या विषयावरून देशात अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्यात आजवर एकोणतीस लोकांना ठार मारण्यात आले आहे. अशा हिंसक वातावरणात प्राण्यांच्या एका पुनर्वसन केंद्रातील अंजली गोपालन यांची भूतदयेची धडपड नव्या जगाची संकल्पना मांडताना दिसते आहे...
हरयानाच्या एका गावातील गोष्ट! लग्न समारंभात नवरा मुलग्याची वरात काढण्यासाठी एक जातिवंत घोडी आणली होती. घोडीच्या मालकाला हे काम मिळाल्याने रागावलेल्या दुसऱ्याने हल्लाच केला. गावातील दोन गटांत हाणामारी सुरू झाली. सुंदर घोडीमुळे आपला धंदा मार खात असल्याचा तो राग होता. घोडीच्या मालकावरील हल्ला करून न थांबता दुसऱ्या गटाने घोडीचे डोळेच काढून टाकले. माणसांच्या क्रूरतेची ती घोडी बळी ठरली. डोळेच गमावलेल्या घोडीवर बसून कोणी वरात काढणार...? या विचाराने मालकाने घोडीला सोडून दिले. त्या भयानक
हल्ल्याने घाबरलेल्या घोडीला आधार मिळाला सेलाखरी गावच्या माळावर उभारलेल्या आधार केंद्राचा! याचे नाव आहे ‘आॅल क्रिचर्स ग्रेट अ‍ॅण्ड स्मॉल!’
एक हेक्टरवर उभारलेल्या या विस्थापित प्राण्यांच्या कळपात ही घोडी विनाडोळे सहजपणे वावरत असते. सोबतीला गायी, म्हशी, घोडे, गाढव, नीलगाय, बैल, शेळ्या-मेंढ्या आहेतच. शिवाय कुत्र्यांसाठीचा स्वतंत्र विभागही बाजूला आहे. त्या विभागात एक-दोन डझन नव्हे, तर साडेतीनशे कुत्री राहतात. त्यातही दोन भाग आहेत. स्वत:ला उच्चभ्रू समजणाऱ्या समाजातील अनेकजण उच्च जातीची हजारो रुपये खर्च करून कुत्री पाळलेली असतात; पण त्यांना अपघात झाला, असाध्य रोग झाला तर दूरवर रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात येते. अशाच सुमारे एक लाख रुपयांचा कुत्रा सांभाळणे शक्य नाही म्हणून दिल्लीच्या रस्त्यावर सोडून देण्यात आला होता. त्याचे पुनर्वसन या केंद्रात करण्यात आले आणि तो अत्यंत आनंदी जीवन जगतो आहे. ज्या घोडीचे डोळे काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळाली तिला आणण्यासाठी या केंद्राचे कार्यकर्ते गेले. तिला घेऊन आले. ती घोडी इतकी घाबरली होती की, माणसांचा वावर जाणवला तरी ती बिथरून जायची. या केंद्राच्या दवाखान्यात डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. तिला एका खोलीत ठेवण्यात आले. ती इतकी घाबरली होती आणि डोळ्यांनी सृष्टीच दिसत नाही, याची कल्पनाच ती करू शकत नव्हती. त्यामुळे सुमारे सहा महिने ती खोलीतून बाहेरच येत नव्हती. माणसांचे प्राण्यांवरील अत्याचाराची फारशी गांभीर्याने चर्चा होतच नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाढवाला मोटार धडकून गेली. त्याचे पुढील दोन्ही पाय मोडले. तीन
दिवस ते गाढव विव्हळत रस्त्यावर पडून होते. देशाच्या राजधानीला जाणाऱ्या रस्त्यावरची ही गोष्ट होती. त्या गाढवाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ते आज आनंदी जीवन या केंद्रात जगते आहे.
केवळ चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या विस्थापित प्राण्यांच्या स्वप्नवत जगात सध्या पाचशे प्राणी राहतात. गाढवापासून घोडी, गायी, म्हशी, नीलगाय, इमू, ससे, पोपट, शेळी, मेंढ्यांची जणू सभाच भरलेली असते.अंजली गोपालन नावाच्या प्राणी, पक्ष्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या साठाव्या वर्षात १ सप्टेंबरला पदार्पण करणाऱ्या महिलेची ही कर्तबगारी आहे. ती काही प्राणिमित्र वगैरे नव्हती; मात्र प्राण्यांची प्रचंड आवड होती. नवी दिल्लीच्या गुलमोहर पार्क या अतिउच्चभ्रू सोसायटीत राहते. वडील तामिळीयन आणि आई पंजाबी! वडिलांनी एअरफोर्समध्ये नोकरी केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रवासासाठी सारथी म्हणूनही काहीवेळा काम केले. पुण्याच्या एनडीएमध्ये शिक्षकाची भूमिकाही पार पाडली. त्यांची ही कन्या अंजली गोपालन! एचआयव्ही-एड्स विरुद्ध प्रचंड काम केले आहे. नाझ फौंडेशन नावाने स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली. एचआयव्हीने बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुमारे पंचवीस वर्षे अत्यंत तन्मयतेने काम केले. त्यांच्यासाठी समुपदेशन केंद्र चालविले.
दवाखाना चालविला, निराधार झालेल्या मुलांसाठी वसतिगृह चालवून त्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. आई-वडील एचआयव्हीने मरण पावल्याने निराधार झालेल्या लहान-लहान मुलांचे संगोपन केले. त्यापैकी अनेक मुले आता शिक्षण पूर्ण करीत आली आहेत. त्यात एक कोल्हापूर जिल्ह्यातील मुलगी पण आहे. ती चार वर्षांची असताना आई-वडिलांचे निधन झाले, इतर नातेवाइकांनी तिचा सांभाळ करण्यास नकार दिला. सांगलीच्या संग्राम संस्थेने तिच्या पुनर्वसनासाठी अंजली गोपालन हिच्याशी संपर्क साधला. आता ती मुलगी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. लहानपणी शिकलेले मोडकंतोडकं मराठी पार विसरून गेली आहे. एचआयव्ही-एड्स संदर्भात काम करणाऱ्या लोकांमध्ये तसेच संस्थांमध्ये
अंजली गोपालन आणि तिच्या नाझ फौंडेशनचा मोठा दबदबा आहे. केंद्र सरकारच्या धोरण ठरविणाऱ्या अनेक समित्यांवरही तिने काम केले आहे. सरकारच्या अयोग्य धोरणांविरुद्ध प्रसंगी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही तिने अनेकवेळा ठोठावले आहेत. तृतीयपंथीयांच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात तिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला खटला गाजला होता. त्याचा निकाल हा केस स्टडी म्हणून मानला जातो.अशा या अंजली गोपालन हिला प्राणिमात्राची खूप दया आहे. रस्त्यावर गायी सोडलेल्या, त्या पालापाचोळा, सडलेले अन्न खाताना, प्लास्टिकच्या पिशव्या चघळताना पाहताना तिचा जीव तीळतीळ तुटतो. दिल्लीपासून केवळ एकोणतीस किलोमीटरवर फरिदाबाद-गुडगाव महामार्गाच्या पलीकडे असलेल्या सेलाखरी गावात तिने विस्थापित प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी अडीच एकरांत हे
केंद्र उभारले आहे. उत्तम सोय आहे. जनावरांसाठी चारा साठवण करण्यास स्वतंत्र इमारत, दवाखान्याची सोय, आॅपरेशन झालेल्या प्राण्याला विश्रांतीसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वयंपाक घर, सोळा कर्मचारी, त्यांच्या राहण्याची सोय,
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि त्या आंधळी घोडीला चरण्यासाठी खास गवताचा पट्टाही तयार केला आहे. ती ‘त्या’ भीतीतून बाहेर आली आहे आणि कोणाच्या आधाराशिवाय पाण्याच्या टबकडे जाते, पाणी पिते आणि हिरवे गवत चरून खाण्यासाठी बरोबर त्या दरवाजातून जातेसुद्धा.एकही असा प्राणी नाही की, ज्याची काही न काही करुण कहानी नाही. साडेतीनशे कुत्र्यांपैकी जवळपास तीनशे कुत्र्यांचे चारही पाय ठीक नाहीत. वाहनांच्या खाली आलेली ही कुत्री एक-दुसऱ्या पायाने अधू आहेत. काही कुत्र्यांचे पाय पूर्णपणे काढावे लागले, ते ठणठणीत आहेतच. शिवाय तीन पायांवर लंगडी घालावी तशी उत्तम चालही करतात.
आम्ही जेव्हा उन्हाळी सुटीच्या निमित्ताने या केंद्राला भेट दिली त्या दिवशी डॉक्टर कुत्र्यांची कुटुंब नियोजनाची आॅपरेशन करून थकले होते. त्यांनी एकाच दिवसांत सोळा आॅपरेशन केली होती. काहींना सलाईन लावले होते, काहींच्या पायावर उपचार चालू होते. एकाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातला गेला आहे. अंगठा बसेल अशी खोक पडली आहे. गेले सहा महिने त्या कुत्र्यावर उपचार चालू आहेत. उत्तम पद्धतीने ड्रेसिंग करून घेणारा हा कुत्रा एकदम देखणा आहे.
इमू पालन व्यवसाय तेजीत चालणार म्हणून लोकांनी पाळले, पण त्याच्या अंड्यांना भाव मिळाला नाही म्हणून सोडून दिली. ती रस्त्यावर भटकत होती अशी आठ इम्मू या केंद्रात सध्या आहेत. गाढवांचा अपघात झाला, कामाला निरुपयोगी झाला म्हणून सोडलेली डझनभर गाढवं बागडत आहेत.अशा प्राण्यांचे हे केंद्र म्हणजे विस्थापितांचे स्वप्नवत नंदनवनच आहे. हवा उत्तम, जागा सुरक्षित, स्वच्छ पाणी, उत्तम चारा, असंख्य झाडाझुडपांची सावली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुक्त वातावरणात वावरण्याचे स्वातंत्र्यही आहे. काश्मिरी शेळ्या, मेंढ्यांची देखणी रूपे येथे पाहायला मिळतात. भटक्या कुत्र्यांशिवाय पाळीव कुत्र्यांची जत्रा तर प्रेमात पडावी अशी आहे. त्यापैकी अनेक म्हातारी झाली म्हणून सोडून दिलेली आहेत. वय झाले तरी त्यांचा रूबाब कमी झालेला नाही. अंजली गोपालन हिचा मायेचा हात असल्याने त्यांचे वय वाढते आहे. यापैकी बहुतांश सर्व प्राण्यांबरोबर हिचे वैयक्तिक नाते आहे, असे वाटते. हे संपूर्ण केंद्र दाखवीत असतानाच प्रत्येक प्राणी तिच्याजवळ येत होता. शेवटी इमूजवळ गेलो तेव्हा ते (पाहुण्यांना घाबरून) पळून गेले आणि आंधळी घोडीच्या रस्त्यावरील दार बंद होते. ते उघडण्यासाठी वाजवून अंजलीच्या आवाजाच्या दिशेने ती येत होती. तिच्याजवळ थांबली, तिचा हात पाठीवरून फिरताच समोर (तिला) न दिसणाऱ्या हिरव्या गवतात चरण्यास निघून गेली.

-- वसंत भोसले

Web Title: The paradise of displaced animals ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.