समांतर बिरादरीची भाजपात चर्चा
By admin | Published: March 13, 2016 04:46 AM2016-03-13T04:46:32+5:302016-03-13T04:46:32+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट कनेक्ट असणाऱ्यांची एक मोठी फळी ‘मुख्यमंत्री मित्र’ या उपक्रमाद्वारे तयार केली जात असून, त्यामुळे भाजपामधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
यदु जोशी, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट कनेक्ट असणाऱ्यांची एक मोठी फळी ‘मुख्यमंत्री मित्र’ या उपक्रमाद्वारे तयार केली जात असून, त्यामुळे भाजपामधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री-सरकार आणि पक्ष यांच्यात प्रभावी समन्वयासाठीच हा प्रयत्न असल्याचे या उपक्रमाच्या कर्त्याधर्त्यांचे म्हणणे आहे.
भाजपाच्या सध्याच्या यंत्रणेला सरकार आणि जनतेतील दुवा म्हणून काम करण्यात अपेक्षित यश न आल्याने, ‘मुख्यमंत्री मित्र’चा पर्याय पुढे आला आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना हजारो नागरिकांशी जोडून समांतर बिरादरी तर निर्माण केली जात नाही ना, अशी शंका घेतली जात आहे. तथापि, नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात स्वत:चा गट निर्माण करण्यात कधीही रस नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या विकासात जनतेला सामावून घेण्यासाठी ‘मुख्यमंत्री मित्र’ उपक्रमाला मान्यता दिली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. प्रत्यक्ष भाजपाचे काम करण्याची इच्छा नाही, पण सामाजिक कार्यात रस आहे, अशा लोकांना मुख्यमंत्री आणि पक्षाच्या जवळ आणण्यासाठी हा अजेंडा असल्याचे बोलले जाते.
या उपक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दहा जणांची एक टीम तयार केली जात आहे. त्यात एक निवृत्त सरकारी अधिकारी, एक निवृत्त पोलीस अधिकारी, एक निवृत्त शिक्षक, डॉक्टर आणि माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञाचा समावेश असेल. सरकारी योजनांची गावपातळीवर नीट अंमलबजावणी होते की नाही, कुठे, कोणत्या उणिवा आहेत, याचा फीडबॅक ही टीम घेईल आणि दर आठवड्याला मुख्यमंत्री कार्यालयास रिपोर्ट करेल. भाजपा आणि मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयासाठी नियुक्त करण्यात आलेले ओएसडी श्रीकांत भारतीय यांचीही या उपक्रमात महत्त्वाची भूमिका असेल.
‘मुख्यमंत्री मित्र’ हे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच काम करतील. लोक आपले काम घेऊन मुख्यमंत्री, मंत्री वा प्रशासनाच्या दारी जातात. लोकांना सरकार दरबारी कोणत्या अडचणी आहेत, हे विचारण्यासाठी मुख्यमंत्री मित्र त्यांच्या दारी जातील. तीन महिन्यांनंतर प्रत्येक तालुक्यात ‘मुख्यमंत्री मित्र’ची टीम उभी केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची आॅनलाइन इच्छा बाराशे जणांनी गेल्या वीस दिवसांत व्यक्त केली आहे. प्रत्येक ‘मुख्यमंत्री मित्र’ची निवड ही वैयक्तिक मुलाखतींद्वारेच करण्यात येणार आहे.