Param Bir Singh : "परमबीर यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 01:34 PM2021-11-02T13:34:54+5:302021-11-02T13:35:19+5:30
भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांचा आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब असतील, पळून गेले असतील तर गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून गेले कसे? याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मंत्री मलिक यांना दिलं आहे.
परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेले मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना? रेशनकार्ड, आधार कार्ड हे इथलेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करीत असल्याचा आरोपही शेलार केला.
"ते पळून गेले असतील तर ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय.परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. ते जर सापडले तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल, त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, हा.एक डाव आहे," असा दावा त्यांनी यावेळी केला.
निलंबित करण्याची तयारी
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांचा पगार या महिन्यापासून रोखण्यात आला आहे. याशिवाय परमबीर सिंग यांना निलंबित करण्याची तयारी सुरु आहे. ठाणे, मुंबई गुन्हे शाखेकडे त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याविरोधात अदखलपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता परमबीर सिंग यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असं तपास अधिकारी रमेश महाले यांनी सांगितलं. परमबीर सिंग नेपाळमार्गे बेल्जिअमला गेल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. याबाबत रमेश महाले म्हणाले की, जर हा दावा खरा ठरला तर परमबीर सिंग यांच्या बेल्जिअम येथील पत्त्यावर नोटीस पाठवली जाऊ शकते.