Param Bir Singh: सचिन वाझेच्या पुनर्वसनासाठी ठाकरे, देशमुखांनी आणला दबाव, धक्कादायक दावा करत परमबीर सिंह यांनी केले अनेक गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 07:16 AM2022-02-03T07:16:05+5:302022-02-03T07:16:48+5:30
Param Bir Singh: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी, तसेच त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद व तपासासाठी गुन्हे देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता, अशी धक्कादायक माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे.
मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी, तसेच त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद व तपासासाठी गुन्हे देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता. पुढे वाझे याने पोलीस खात्यात परतण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचे सांगितले होते, अशी धक्कादायक माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे. त्यांच्या जबाबाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या १०० कोटी वसुली, भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवत २ नोव्हेबर रोजी देशमुखांंना अटक करण्यात आली होती. यादरम्यान परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात, ‘वाझेची २०२० मध्ये पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. सर्व निलंबनाच्या प्रकरणांचा आढावा मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केला जातो. वाझेच्या पुनर्नियुक्तीची कारणे पुनरावलोकन समितीच्या फाईलमध्ये आहेत,’ असे स्पष्ट केले.
तसेच वाझे हा थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना त्याच्याकडील गुन्ह्यांची माहिती देत होता. तसेच तेसुद्धा त्याला सूचना देत होते. देशमुख यांनी वाझेला दर महिना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. यातील ४० ते ५० कोटी रुपये मुंबईतील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटकडून वसूल करण्यास सांगितले होते. वाझेसह एसीपी संजय पाटील यांच्याकडून आपल्याला ही माहिती समजली, होती असे परमबीर सिंह यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे.
वाझे यांना घेऊन अनेक ‘महत्त्वाची’ कामे दिली गेली
सचिन वाझे याच्या पुनर्नियुक्तीसाठी अनिल देशमुख यांच्या प्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडूनही मला थेट सूचना देण्यात आल्या होत्या. वाझेच्या क्राईम ब्रॅंचमधील नियुक्तीसंदर्भातही मला तशाच सूचना मिळाल्या होत्या. त्या सूचनांवरूनच गुन्हे गुप्तवार्ता विभागात नियुक्ती असलेल्या सचिन वाझेकडे महत्वाची प्रकरणे तपासासाठी सोपवली जात होती. त्या दोघांकडून त्याला बोलावून पुढील सूचनाही देण्यात येत होत्या. अनिल परबसह इतरही मंत्री टीआरपी प्रकरण, डीसी मोटर्स, क्रिकेट बेटींग मनपा कंत्राटदारांविरोधातील प्रकरणासह अन्य प्रकरणांच्या तपासाच्या सूचना वाझे याला देत.
गुलाबी पेनने मार्क करून चार याद्या दिल्या
२०२० साली पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख यांनी गुलाबी पेनाने त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली यादी मला दिली होती. त्यांनीच दुसरी एक यादी देऊन त्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यास सांगितले होते. त्यांनी दिलेली पाच पानांच्या तिसऱ्या यादीतील ५४ अधिकाऱ्यांच्या मुंबईअंतर्गत करण्यासाठी दिली होती. दोन पानांची २४ अधिकाऱ्यांच्या नावाची चौथी यादीही बदल्यांसाठी दिली होती. त्या चर्चेमध्ये झालेले मुद्दे मी त्यावर पेन आणि पेन्सिलने लिहिले होते. त्या चारही याद्या अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्याकडून फायनल करण्यात आल्या होत्या. सह्याद्री, ज्ञानेश्वरी येथील या बैठकांना सचिव संजीव पालांडे हेही उपस्थित होते.
पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डच्या नियमांचे उल्लंघन
अनिल देशमुख यांच्यामुळे अनेकदा पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डच्या नियमांचे उल्लंघन झाले. देशमुख कधी स्वत: तर कधी सीताराम कुंटे यांच्या माध्यमातून नियमांची पायमल्ली करून सूचना द्यायचे. प्रशांत कदम यांची नियुक्तीही परिमंडळ ७ येथे अशीच करण्यात आल्याचा खुलासाही परमबीर सिंह यांनी आपल्या जबाबात केला आहे.
परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले, त्याच वेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आरोप केले. या वादावादीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कटुता निर्माण कशी होईल याचेही प्रयत्न पडद्यावर सुरू आहेत.