परमबीर सिंह बेपत्ता; सीआयडीकडून शोध सुरू, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 06:38 AM2021-09-19T06:38:06+5:302021-09-19T06:38:33+5:30
परमबीर यांनी तत्कालीन देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ३० एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यानंतर अद्याप परतलेले नाहीत.
जमीर काझी -
मुंबई : काही महिन्यांपासून बेपत्ता असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता झाले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाकडून (सीआयडी) त्यांचा शोध सुरू असून, एक पथक त्यांच्या मूळगावी चंदीगड येथे ठिय्या मारून आहे. (Parambir Singh missing; Search launched by CID, possibility of fleeing to London via Nepal)
परमबीर सिंह यांना न्या. चांदीवाल आयोगाने अजामीनपात्र वाॅरंट बजावले असून, हे देण्यासाठी पथक तिकडे गेले. मात्र, ते नमूद पत्त्यावर आढळले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परमबीर यांनी तत्कालीन देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ३० एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यानंतर अद्याप परतलेले नाहीत. आधी आठ दिवसांची रजा घेतल्यानंतर त्यांनी सतत आजारी असल्याचे प्रमाणपत्र पाठवून ‘मेडिकल लिव्ह’ वाढविली. १५ दिवसांपासून त्यांनी त्याबाबत गृहविभागाशी पत्रव्यवहार केला नसल्याचे समजते.
दरम्यान लिहिलेल्या पत्राबाबत न्या. चांदीवाल आयोगाच्या सुनावणीला ते एकदाही हजर राहिलेले नाही. त्यामुळे आयोगाने त्यांना अजामीनपात्र वाॅरंट बजावले. सीआयडीने त्यासाठी आधी मरिन लाईन्सच्या निवासस्थानी संपर्क साधला. मात्र, ते घर पाच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पथकाने चंदीगडच्या निवासस्थानी जाऊन शोधाशोध सुरू केली आहे. मात्र, तिकडेही ते सापडलेले नसून, त्यांच्याशी संबंधिताच्या ठिकाणी शोध घेतला जात आहे.
सुनावणीकडे लक्ष -
चांदीवाल आयोगाची चौकशी रद्द करण्याची सिंह यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली. याची सुनावणी येत्या २२ सप्टेंबरला होत आहे.
दोन्ही मोबाईल पाच महिने स्वीच ऑफ? -
परमबीर यांचे दोन्ही मोबाईल पाच महिन्यांपासून स्वीच ऑफ आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली असली, तरी त्यापूर्वीच ते परदेशात गेल्याची चर्चा आहे. ते नेपाळमार्गे लंडनला गेले असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत अधिकृत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ठाणे पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी सिंह यांच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे.