परमबीर सिंग खरे बोलले, 'मविआ'ने दिली होती माझ्या अटकेची सुपारी; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 12:49 PM2024-08-11T12:49:42+5:302024-08-11T12:52:45+5:30
काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिल्याचाही केला उल्लेख
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: परमबीर सिंग जे बोलले ते खरे आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो. मी, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन अन्य काही नेते यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती. पण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, माझ्या अटकेसाठी एकदा नाही तर चार वेळा प्रयत्न झाले. पण यांना काही मिळाले नाही. यांचे व्हिडीओ पुरावे सीबीआयला देण्यात आले आहेत. आजही आमच्याकडे अनेक व्हिडीओ पुरावे आहेत. योग्यवेळी ते सादर करू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
- खोट्या केसेस करायला नकार
- परमबीर सिंग यांचे आरोप पूर्णपणे सत्य आहेत. असे अनेक प्रयत्न झाले. खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल, याचे षड्यंत्र आखण्यात आले.
- मविआच्या काळात आमच्या अनेक नेत्यांना अक्षरश: जेलमध्ये टाकण्याची सुपारी देण्यात आली होती. पण ते करू शकले नाही.
- अनेक चांगले अधिकारी होते ज्यांनी अशा खोट्या केसेस करायला नकार दिला, असेही फडणवीस म्हणाले.