पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम

By admin | Published: May 20, 2017 01:53 AM2017-05-20T01:53:40+5:302017-05-20T01:53:40+5:30

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन: नवीन वीज प्रकल्पाचे काम सुरू करण्याची आमदार सिरस्कार व स्थानिकांची मागणी

The Paras electricity center's performance is the best | पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम

पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पारस : पारसच्या नवीन वीज प्रकल्पासंदर्भात अभ्यास करून आपण १५ दिवसांत निर्णय घेणार आहोत, तसेच सांघिक सामाजिक बांधीलकी अंतर्गत परिसरातील गावांमध्ये वॉटर फिल्टर बसविणे व जलसिंचनासह अन्य कामेदेखील केली जातील, असे सांगून कमीत कमी कोळशात महत्तम वीज उत्पादन, वीज वापरात बचत, पाणी बचत व पुनर्वापर, परिसरात साफसफाई व एकूणच नियोजनपूर्वक कामे केल्याने पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम असल्याचे गौरवोद्गार राज्याचे ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १८ मे रोजी पारस वीज केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान प्रतिपादन केले.
यावेळी बावनकुळे यांनी १८ मे रोजी महानिर्मितीच्या पारस औष्णिक वीज केंद्राचा कोळसा हाताळणी विभाग, राख हाताळणी विभाग, शून्य पाण्याचा निचरा, पीसीआर-३ इत्यादी विभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व तेथील अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांसमवेत थेट संवाद साधला. त्यानंतर पारस वीज केंद्राच्या कामगिरीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी सविस्तर आढावा घेतला. विभाग प्रमुखांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले, तसेच संचालक यांच्या पंचसूत्री कार्यक्रमाची त्यांनी प्रशंसा केली.
याप्रसंगी आमदार बळीराम सिरस्कार, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) विनोद बोंदरे, मुख्य अभियंते राजेंद्र बावस्कर, अनंत देवतारे, अधीक्षक अभियंते कन्हैयालाल माटे, रूपेंद्र गोरे, श्रीराम बोडे, सुधाकर पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कांबळे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार बाळापूर, भाजपा अकोला जिल्हा अध्यक्ष तेजराव थोरात प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीनंतर बाळापूर नगर परिषदेच्या वतीने विकासात्मक कामांबाबत निवेदन देण्यात आले, तसेच ग्रामपंचायत कोळसा, पारस, सातरगाव, मनारखेड येथील विविध समस्यांबाबत बावनकुळे यांना अवगत करण्यात आले.या बैठकीत बोलताना आ. बळीराम सिरस्कार म्हणाले, की पारस वीज प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. या भागाचा अधिक विकास करण्यासाठी पारस येथे ६६० मेगावॅटचा संच सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पारस येथे ६६० मेगावॉट नवीन वीज प्रकल्प होणार
पारस येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी मूलभूत बाबी तपासणे, अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यात जमीन, पाणी, शेगाव, अकोला शहर, खामगाव येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज उत्पादनासाठी वापर, कोळसा लिकेज, वीज उत्पादन खर्च, वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता मेरिट आॅर्डरमध्ये संच बसेल किंवा नाही, आगामी काळातील विजेची मागणी व पुरवठा यांचा तुलनात्मक अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात भुसावळ, नाशिक, पारस, उमरेड या भागात नवीन वीज प्रकल्प सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे ते म्हणाले.

सांघिक सामाजिक बांधीलकी
केंद्र अथवा राज्य शासनाच्या योजनांमध्ये समाविष्ट नसलेली कामे, महानिर्मितीच्या सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत करण्यात यावी व त्यासंबंधी आवश्यक संयंत्र खरेदी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. परिसरातील नारखेड, पारस, कोळासा, मांडोली, शेळद, सातरगाव, कुपटा, हिंगणा, बटवाडी या गावांमध्ये १० वॉटर फिल्टर बसविण्याचे निर्देश आपण देणार आहोत.
परिसरातील ५० गावांमध्ये शेत रस्ते, नाले, तलाव यांची कामे करून जलसाठा वाढविता येईल, जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास हातभार लागेल व पर्यायाने महानिर्मितीची प्रतिमा अधिक उजळ होईल, असेही ते म्हणाले.

 

Web Title: The Paras electricity center's performance is the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.