परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 06:24 AM2024-12-12T06:24:42+5:302024-12-12T06:24:59+5:30

वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, बाजारपेठ बंद

Parbhani bandh turns violent; curfew imposed; tension continues | परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम

परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम

लोकमत न्यूज नेटवर्क  
परभणी : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची माथेफिरूने तोडफोड केल्याची घटना १० डिसेंबरला घडली होती. त्या निषेधार्थ आयोजित बंदला हिंसक वळण लागल्याने बुधवारी दुपारनंतर शहरात जमावबंदी लागू करावी लागली. परिस्थिती नियंत्रणात आली तरीही तणाव कायम आहे. एसआरपीएफच्या सहा तुकड्या मागविण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात आंबेडकरी जनतेने बंदची हाक दिली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून परभणी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर टायर जाळून चक्का जाम करण्यात आला होता. दुपारपर्यंत विविध भागांतील समर्थक आंदोलनात सहभागी होत गेले. 

डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातही मोठा जमाव जमला. सगळे शांततेत सुरू होते. मात्र, दुपारी १२ वाजल्यानंतर काही तरुणांनी दुकानाच्या शटरवर दगडफेक केली. फलक काढून रस्त्यावर जाळले. दोन वाहनांची तोडफोड केली. दोन वाहने जाळली. यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली. तोपर्यंत विविध भागातील शेकडो वाहने व दुकानांसमोर  असलेले सामान आंदोलकांनी नासधूस करून खराब केले अथवा पेटवून दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील संचिका फेकल्या 
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी काहीजण गेले होते. तेथेही काचा फोडल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना घेराव घातला. तसेच त्यांच्या टेबलवरील संचिका महिलांनी फेकून दिल्या. 

इंटरनेट सेवा बंद : जिल्ह्यात कलम १६३ लागू करून पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र जमण्यास मनाई केली. इंटरनेट, झेरॉक्स, आदी सेवा बंद करण्यास आदेशित केले. स्टेशन रोड व पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पोलिसांवरच दगडफेक झाली. अधिकची कुमक आल्यानंतर पोलिसांनी आधी अश्रुधुराचा वापर केला. नंतर सौम्य बळाचा वापर केला.  

मुख्य आरोपी अटकेत आहे. गुन्हाही दाखल केला. गरज पडल्यास आणखी सखोल चौकशी करून यामागे कुणी आहे का? याचा शोध लावला जाईल. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाईल.  
    - रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी, परभणी

परिस्थिती नियंत्रणात आणण्यास एसआरपीएफ तुकडी मागविली आहे. कोणीही सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करू नये. सर्वांनी शांतता राखावी.
    - शहाजी उमाप, 
    विशेष पोलिस उपमहानिरीक्षक

Web Title: Parbhani bandh turns violent; curfew imposed; tension continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.