परभणीत काँग्रेसला अनपेक्षित यश
By admin | Published: April 21, 2017 04:37 PM2017-04-21T16:37:30+5:302017-04-21T16:37:30+5:30
परभणी येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाले असून गेल्या पाच वर्षापासून सत्तेत
Next
>अभिमन्यू कांबळे /ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 21 - परभणी येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाले असून गेल्या पाच वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला यावेळी अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेला मात्र अंतर्गत मतभेदाचा फटका बसला असून भाजपाने बऱ्यापैकी कामगिरी केली आहे.
परभणी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते. या निवडणुकीत जागा वाटपापासूनच काँग्रेस पक्षात निर्माण झालेले मतभेद पक्षाच्या प्रचारातही दिसून आले होते. नवी काँग्रेस व जुनी काँग्रेस असे सरळ दोन गट पडले असताना निवडणूक निकालात मात्र या पक्षाने अनपेक्षित बाजी मारल्याचे दिसून आले. गेल्यावेळी सभागृहात २२ जागांवर असलेल्या काँग्रेसने आणखी ९ जागांची भर टाकून नव्या सभागृहातील संख्याबळ ३१ पर्यंत नेले आहे. सभागृहात बहुमतासाठी आणखी २ जागांची काँग्रेसला आवश्यकता असून सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस कोणाची मदत घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे गेल्या पाच वर्षांपासून महापौरपद स्वत:च्या ताब्यात ठेवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता कायम ठेवता आली नाही. गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या सभागृहात ३० जागा होत्या. यावेळी हे संख्याबळ १२ ने घटून १८ जागांवर आले आहे. राष्ट्रवादीच्या मावळत्या महापौर संगिता वडकर यांचे पती राजेंद्र वडकर यांचा दारुण पराभव झाला असून या पक्षाचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले आहेत.
शिवसेनेला मात्र अंतर्गत गटबाजीचा जोरदार फटका बसला असून पक्षाचे संख्याबळ यावेळी ८ वरुन ६ वर आले आहे. शिवसेनेचे खा.बंडू जाधव व आ. डॉ.राहुल पाटील यांच्यातील मतभेदाचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे दिसून आले आहे. आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी मनपाची निवडणूक शिवसेनेने लढविली होती. शिवसेनेच्या मनपातील विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर यांचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा झालेला पराभव काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक बऱ्यापैकी लाभाची ठरली आहे. गेल्यावेळी केवळ २ सदस्य संख्याबळ असलेल्या या पक्षाचे आता ८ सदस्य निवडून आले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १५ मध्ये या पक्षाचे पाचही उमेदवार निवडून आले असून या पक्षाचे गेल्या चार निवडणुकांमध्ये विजय मिळविणारे नगरसेवक दिलीप ठाकूर यांचा मात्र काँग्रेसचे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी पराभव केला आहे. हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागणारा आहे.
बहुमतासाठी काँग्रेसची मदार अपक्षांवर
महानगरपालिकेत बहुमतापासून केवळ दोन जागांनी दूर असलेल्या काँग्रेस पक्षाला मनपात सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही अपक्ष उमेदवारांना सोबत घ्यावे लागणार आहे. यासाठी या दोन्ही अपक्षांना पदेही द्यावी लागणार आहेत. अपक्षांचा भाव वधारला तर काँग्रेसने ज्या प्रमाणे परभणी पंचायत समितीमध्ये सभापतीपदासाठी भाजपाची मदत घेतली होती, त्याच फॉर्म्यूल्यानुसार येथे काँग्रेस भाजपाची मदत घेऊ शकतो. अशावेळी उपमहापौर भाजपाला द्यावे लागेल. पदाची ही सौदेबाजी काँग्रेसला भविष्यकाळात परवडणारी नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष असा निर्णय घेण्याची शक्यता धुसरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला मदत घेण्यापासून झिडकारले होते. त्यामुळे मनपात राष्ट्रवादीची काँग्रेस मदत घेणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
अंतिम पक्षीय संख्याबळ
काँग्रेस- ३१
राष्ट्रवादी काँग्रेस- १८
शिवसेना - ०६
भाजपा-०८
अपक्ष-०२
एकूण जागा- ६५