परभणीचं पालकमंत्रिपद काही दिवसंच माझ्याकडे असावं अन्...; धनंजय मुंडेंची देवाकडे प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 06:47 PM2022-03-19T18:47:15+5:302022-03-19T18:47:52+5:30
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले नवाब मलिक हे सध्या कोठडीत आहेत.
बीड - आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक सध्या कोठडीत आहेत. यानंतर आता त्यांच्याकडे असललेली परभणीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात आज प्रतिक्रिया देताना, 'ही पालकमंत्रिपदाची जबाबदारी काही दिवसच माझ्याकडे राहावी, अशी इश्वराकडे प्रार्थना करतो, असे मुंडे यांनी म्हटले आहे. बीडमध्ये आयोजित जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते.
मुंडे म्हणाले, "यासंदर्भात आमच्या अध्यक्षांनी घोषणा केल्याचे मला सांगण्यात आले आहे. मात्र, सर्व गोष्टी अधिकृतपणे होणे आवश्यक आहे. फार मोठी जबाबदारी आहे. नवाब भाई स्वतः परभणीचे पालकमंत्रीपद पाहत होते. आता त्यांची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. इश्वराकडे प्रार्थना आहे की, काही दिवसांसाठीच ती जबाबदारी माझ्यावर असावी. पुन्हा ती जबाबदारी नवाब भाईंनीच घ्यावी."
परभणीचं पालकमंत्रिपद काही दिवसंच माझ्याकडे असावं अन् नंतर...; धनंजय मुंडेंची देवाकडे प्रार्थना@dhananjay_munde#dhananjaymunde#Navabmalikpic.twitter.com/LNGh6sSoTb
— Lokmat (@lokmat) March 19, 2022
जामिनासाठी 3 कोटींची मागणी, मालिकांच्या मुलाची तक्रार -
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले नवाब मलिक हे सध्या कोठडीत आहेत. मलिक यांच्या जामिनासाठी तीन कोटी रुपये बिटकॉईनच्या स्वरूपात मागितल्याची तक्रार त्यांचा मुलगा आमीर मलिक यांनी केल्यानंतर, विनोबा भावे नगर पोलिसांनी भादंवि कलम 419, 420, 511 व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम 66 (ड) अंतर्गत इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात आरोपीचा क्रमांक, संदेश, मेलचे स्क्रीनशॉट पोलिसांना देण्यात आले आहेत. संबंधित क्रमांक तसेच मेल आयडीवरून पोलीस अधिक तपास करत आहे.