परभणी, हिंगोलीत सव्वाचार कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा, वसुलीची प्रक्रिया सुरू; आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे लाटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:27 AM2017-12-23T03:27:00+5:302017-12-23T03:27:13+5:30
आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणाºया केंद्र शासनाच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांनी ४ कोटी ३९ लाख ६० हजार २४६ रुपयांचा घोटाळा केला असून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.
अभिमन्यू कांबळे
परभणी : आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणाºया केंद्र शासनाच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांनी ४ कोटी ३९ लाख ६० हजार २४६ रुपयांचा घोटाळा केला असून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी समाजकल्याण व आदिवासी विभागाकडून मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणाºया शिष्यवृत्तीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर विशेष चौकशी पथकाने (टास्क फोर्स) परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३५० महाविद्यालयांची तपासणी केली. आॅगस्ट २०१७ मध्ये चौकशी अहवाल तयार केला. नोव्हेंबरमध्ये तो राज्य शासनाला सादर केला.
दोषी ८३ महाविद्यालयांपैकी फक्त ४ महाविद्यालये हिंगोली जिल्ह्यातील आहेत. हिंगोलीतील शिष्यवृत्ती घोटाळा जवळपास १० लाख; तर परभणीत ४ कोटी २९ लाख हडपले. शिष्यवृत्ती घोटाळ््याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया आदिवासी विभागाने सुरू केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम शासनाकडे ३१ डिसेंबरपर्यंत भरण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
साडेपाच लाख जमा
परभणी जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांनी साडेपाच लाख आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे जमा केले आहेत. उर्वरित महाविद्यालयांनाही तंबी देण्यात आली असून त्यांना पुढील आठवडाभरात रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे.
कसा केला घोटाळा?
एकाच शैक्षणिक वर्षात दोन वर्गात विद्यार्थी दाखवून दोन वेळा शिष्यवृत्ती वाटप केली गेली. बनावट शाळा सोडल्याचा दाखला, अभ्यासक्रम पूर्ण न करता दुसºया अभ्यासक्रमास, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश दिलेले, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मान्यता नसलेले, जात वैधता प्रमाणपत्र नसलेले आदींना एकाच वर्षात शिष्यवृत्ती
व फ्री शीपही देण्यात आली. दुसºयाच्या नावाचे दस्ताऐवज जोडून व एकाच वर्गातील विद्यार्थ्याला दोन ते तीन वेळा शिष्यवृत्ती वाटप केली गेली. लेखापरीक्षणामध्ये हे उघड झाले.
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी घेतलेली ४ कोटी ३९ लाख ६० हजार २४६ रुपयांची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत. तशा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
- डॉ. विशाल राठोड, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, कळमनुरी