पार्सल बंद करण्याचा इशारा!, हॉटेल चालक संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 07:08 AM2018-06-28T07:08:57+5:302018-06-28T07:47:35+5:30
पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया होणाऱ्या पार्सल कंटेनरवरच्या साठ्यावरही छापा टाकून पालिकेचे निरीक्षक कारवाई करत आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवली नाही
मुंबई : पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया होणाऱ्या पार्सल कंटेनरवरच्या साठ्यावरही छापा टाकून पालिकेचे निरीक्षक कारवाई करत आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवली नाही, तर हॉटेलांमधून दिले जाणारे पार्सल बंद करण्याचा इशारा ‘आहार’ या हॉटेल मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईवरून हॉटेल व्यावसायिक आणि महापालिका प्रशासन आमनेसामने उभे ठाकले आहेत. दरम्यान, नव्या कंटनेरमुळे पार्सल अन्नाचे दर वाढले आहेत.
पर्यावरण विभागाच्या निर्णयानुसार एकदाच वापरण्यात येणारे आणि विघटन न होणारे प्लॅस्टिक व थर्माकॉलचे पार्सल कंटेनर हॉटेल व्यवसायिकांनी बंद केले. तसेच त्याला पर्याय म्हणून पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया शक्य असलेले प्लॅस्टिकचे कंटेनर वापरण्यास सुरूवात केली. त्यासाठी ग्राहकांकडून पार्सलमागे जादा रक्कम आकारण्यास सुरूवात केली. पुनर्वापरास योग्य कंटेनरमुळे पार्सल अन्नपदार्थांचे दर १० ते १५ रुपयांनी वाढणार असल्याचेही संघटनेने कबूल केले. पार्सल देताना इडली, चटणी, सांबार असे पदार्थ वेगवेगळ्या कंटेनरमध्ये द्यावे लागतात. त्यामुळे कंटेनरनुसार ग्राहकांना ही दरवाढ सोसावी लागेल. यातही बाय बॅक पॉलिसीनुसार ग्राहकांनी कंटेनर परत केल्यावर काही पैसे कापून उरलेले पैसे परत करण्याचा विचार आहे. येत्या १० ते १५ दिवसांत ही पॉलिसी राबवली जाईल. मात्र तोवर जितके अधिक पदार्थ असतील, तितके पार्सलसाठी अधिक पैसे ग्राहकांना मोजावे लागतील, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.
मात्र रविवारपासून प्लॅस्टिक निर्मूलन पथकातील निरीक्षकांनी संबंधित हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या चुकीच्या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल उद्योग सुमारे ३० टक्के तोट्यात गेला असून यापुढे निरीक्षकांनी दंड आकारल्यास तो न भरण्याचे आवाहन संघटनेचे सरचिटणीस विश्वपाल शेट्टी यांनी हॉटेल व्यावसायिकांना केले. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करत हॉटेलचालकांनी सर्व प्लॅस्टिकच्या पिशव्या हद्दपार केल्या. तसेच विघटन न होणाºया प्लॅस्टिकचे कंटेनरही वापरणे बंद केले. गेल्या तीन महिन्यांत विविध प्रयोग केल्यानंतर पुनर्प्रक्रिया होणारे आणि पुनर्वापरायोग्य पार्सल कंटेनर तयार करण्यात आले. नियमानुसार या कंटेनरचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया शक्य असल्याने त्यावर कायद्याने बंदी घालता येत नाही. मात्र रविवारी प्लॅस्टिक निर्मूलन पथकातील निरीक्षकांनी चेंबूर येथील हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई केली. त्यामुळे निरीक्षकांनाच कायद्याची जाण नसल्याचे निदर्शनास आले आल्याचा आरोपही त्यांनी केला.
अधिकारी-कर्मचाºयांमध्ये समन्वयाचा अभाव?
पालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट टाकून पार्सल कंटेनरवर कारवाई न करण्याचे आदेश दिले, मात्र पालिका निरीक्षक कारवाई करीत आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांत समन्वया नसल्याचा आरोप संतोष शेट्टी यांनी केला.
प्लॅस्टिकला पर्याय नाही! : अॅल्युमिनियम फॉईल, कागदी पार्सलच्या कंटेनरमध्ये द्रवरुपातील भाजी किंवा पदार्थ पार्सल करणे अशक्य असल्याचे मत ‘आहार’ने मांडले. रस्सम, सांबार, उसळ गरमच कंटेनरमध्ये भरावे लागतात. त्यामुळे अॅल्युमिनियम फॉईलमधून बाहेर पडतात, तर कागदी कंटेनर फाटतात. स्टीलच्या डब्यांत सर्वच ग्राहकांना ते देणे अशक्य आहे. पुनर्वापरायोग्य प्लॅस्टिक कंटेनरशिवाय ते पार्सल देणे शक्यच नसल्याचा दावा संघटनेने केला. पालिकेने कारवाई सुरू ठेवल्यास पार्सल बंद करण्यावाचून पर्याय नसल्याचा इशारा संघटनेने दिला.
...तर दंड भरू नका!
लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया होणाºया पर्यावरणपूरक पार्सल कंटेनरचा वापर करण्याचे आवाहन संघटनेने केले. पर्यावरणपूरक पार्सल कंटेनर वापरल्यानंतर पालिकेच्या निरीक्षकांनी दंड आकारल्यास तो भरू नये, असेही संघटनेने सदस्यांसाठी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. कारवाईची तक्रार संघटनेच्या झोन उपाध्यक्षकांकडे करावी, असेही संघटनेने सांगितले.
पालिकेच्या निरीक्षकांनी केलेल्या या कारवाईचा धसका घेत बहुतेक हॉटेल व्यवसायिकांनी पार्सल काऊंटरच बंद केला. त्यामुळे हॉटेल उद्योगाचे सुमारे ३० टक्के नुकसान झाले. यामुळे प्रशासनालाही ३० टक्के महसुलाला मुकावे लागेल.
पर्यावरणपूरक या अन्नपदार्थांच्या डब्यांवर स्पष्ट शब्दांत पुनर्वापरास योग्य असल्याचा संदेश लिहिल्याचा दावा विश्वपाल शेट्टी यांनी केला. तरीही पालिका दंड आकारत असल्याने त्याला विरोध करण्याचा, प्रसंगी पार्सल बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला.