हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन? तपासासाठी पोलीस रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 08:59 PM2019-10-21T20:59:05+5:302019-10-21T21:03:14+5:30
कोल्हापूरला जात असलेल्या पार्सलचा हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट
कोल्हापूर : कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर झालेल्या भीषण स्फोटाच्या कोल्हापूर कनेक्शनची शक्यता असल्याने जिल्ह्यांत ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी दिले. स्थानिक दहशतवादी विरोधी पथक आणि बॉम्बशोध पथकाच्या काही तज्ज्ञांची टीम रात्री तातडीने हुबळीला रवाना झाली.
कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्टेशनवर सोमवारी भीषण स्फोट झाला. अज्ञात वस्तूचा अचानक स्फोट होऊन दोघेजण जखमी झाले. ज्या पार्सलचा स्फोट झाला ते तामिळनाडूमधून कोल्हापूरला येत होते. परंतु ते अज्ञातस्थळी पडलेले पार्सल आरपीएफच्या पथकाच्या हाती लागले आणि त्याचा स्फोट झाला. पार्सलवर राजकीय संदेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोल्हापूरात मोठा घातपात घडवण्याचा कट असल्याचा प्राथमिक अंदाज कर्नाटक पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस सर्तक झाले आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्थानके, मंदिर, मज्जिद आदी ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला असून महामार्गासह शहराला जोडणाऱ्या सर्व नाक्यांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे.
दोन दिवसापूर्वी उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली स्फोटकांचा अॅल्युमिनिअमच्या डब्याचा स्फोट होऊन ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) यांचा हकनाक बळी गेला. पिशव्यांमध्ये भरलेले वाळूचे खडे, गारगोट्या, तांब्याची केबल, सुतळ्या, रासायनिक पावडर, पुंगळी आदी दारूगोळ्याचे साहित्य पुलाच्या शेजारील नाल्यामध्ये मिळून आले होते. याप्रकरणी हातकणंगले येथील तिघा संशयितांकडे चौकशी सुरु आहे. या स्फोटाचे कर्नाटक कनेकशन असलेच्या संशयावरुन हैद्राबाद येथील दहशतवादी पथकाने उजळाईवाडी परिसरात भेट देवून माहिती घेतली होती. हा तपास सुरु असतानाच सोमवारी कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्टेशनवर आंध्रप्रदेशमधील अमरावतीहून हुबळीकडे येणाऱ्या रेल्वे डब्यामध्ये पोलिसांना एक बकेट सापडले. त्यांनी ते आरपीएफ जवानांच्या हातात दिले. त्या जवानांनी ते बकेट उघडले असता त्यामध्ये लिंबूच्या आकाराचे बॉल होते. त्यातला एक हातात घेताना स्फोट झाला. त्यामध्ये जवानाच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. त्या पार्सलवर राजकीय संदेश मिळून आला. हे पार्सल तमिळनाडूहून कोल्हापूरला येणार होते. परंतु ही अमरावती-हुबळी रेल्वे कोल्हापूरला येत नसल्याने ते हुबळी रेल्वे स्टेशनवरचे पोलिसांना मिळून आले. उजळाईवाडी आणि हुबळी येथील स्फोटांचे काही कनेकशन आहे काय, याची चौकशी कोल्हापूर पोलीस करणार आहेत. त्यासाठी एक विशेष पथकच सोमवारी रात्रीच हुबळीला रवाना केले. या दोन्ही स्फोटाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.
कर्नाटक हुबळी रेल्वे स्टेशनवर झालेल्या स्फोटाचे कोल्हापूर कनेकशन असलेची शक्यता कर्नाटक पोलीसांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीने तपास करण्यासाठी विशेष पथक हुबळीला रवाना केले आहे. कर्नाटक पोलिसांशी संपर्कात राहून माहिती घेत आहोत. जिल्ह्यात ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर