पारधी समाजातील तरुणाईने घडविले परिवर्तन!
By admin | Published: July 20, 2015 12:39 AM2015-07-20T00:39:55+5:302015-07-20T00:39:55+5:30
पारधी समाज म्हटला की गुन्हेगार, दरोडेखोरीचा शिक्का बसलेली आदिवासी जमात. श्रीगोंदा तालुक्यातील पारधी समाजातील काही कुटुंबांनी मात्र कठोर परिश्रम,
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)
पारधी समाज म्हटला की गुन्हेगार, दरोडेखोरीचा शिक्का बसलेली आदिवासी जमात. श्रीगोंदा तालुक्यातील पारधी समाजातील काही कुटुंबांनी मात्र कठोर परिश्रम, संघर्ष करीत शेतमळे फुलविले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात सुख, समृद्धीबरोबर शिक्षणाचा नंदादीपही उजळला आहे. पोलिसांचा ससेमिरा थांबला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात पारधी जमातीची ३ हजार ९०० लोकसंख्या असून तालुक्यात सर्वाधिक दरोड्याचे गंभीर गुन्हे घडले. बहुतेक गुन्ह्यांमध्ये पारधी समाजातील गुन्हेगारांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. गुन्हेगारीच्या सावटाखालील अंधारमय जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन शेतीत घाम गाळून जीवनात परिवर्तन करण्यासाठी येथील तरुण पिढीने धडपड सुरू केली आहे.
बेलवंडी येथील फुलचंद चव्हाण यांनी टोमॅटो, बरनश्या भोसले यांनी डाळिंबाची बाग, चंद्रकांत काळे यांनी लिंबोणी, लोणीव्यंकनाथ येथील विलास काळे यांनी झेंडू तर शरद काळे यांनी डाळिंबाची बाग फुलविली आहे. विश्रांत काळे (आढळगाव), सखाराम चव्हाण (ढोरजा), संगीता चव्हाण (वडाळी), सुमन चव्हाण (सुरोडी), बक्कट काळे (बेलवंडी कोठार), सुरेखा भोसले (घारगाव) यांनी ऊस, कांदा, गहू, ज्वारीसारखी पिके घेऊन शेतीत बस्तान बसविले आहे. बहुतेक तरूण शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरसारखे नवे तंत्रज्ञान स्वीकारले. काहींनी मेंढीपालनचा सक्षम मार्ग निवडला आहे. किरण काळे हे जिल्हा सहकारी बँकेत विसापूर शाखेचे व्यवस्थापक आहेत. लोणीचे संतोष भोसले बी. एस्सी. (अॅग्री), छाया भोसले (सिव्हील इंजिनिअर), गोपीचंद काळे (हॉटेल मॅनेजमेंट), प्रमोद काळे (एम. ए.) उच्चशिक्षित झाले असून शाळेतही पारधी समाजातील विद्यार्थ्यांचा आवाज घुमत आहे.