क्षमापना ही देणगी
By Admin | Published: September 10, 2016 01:06 AM2016-09-10T01:06:53+5:302016-09-10T01:06:53+5:30
तसेच दुसऱ्यांना क्षमा करणे व दुसऱ्यांची क्षमा मागण्याने मन प्रसन्न व हलके होते
पुणे : मानवी जीवनात प्रेम, शांती यांना जसे महत्त्व आहे; तसेच दुसऱ्यांना क्षमा करणे व दुसऱ्यांची क्षमा मागण्याने मन प्रसन्न व हलके होते. त्यामुळे जीवन सुखकर व आनंददायी होते. जैन धर्मातील क्षमापना ही विश्वाला मिळालेली देणगी आहे, अशा शब्दांत क्षमापनाचे महत्त्व सामुदायिक क्षमापना कार्यक्रमात विशद करण्यात आले.
जितो पुणे व श्री जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी जैन धर्मातील चार पंथांच्या सामुदायिक क्षमापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प. पू. ललीतप्रभजी म. सा., प. पू. अक्षय दर्शनाजी म. सा., प. पू. दिव्य दर्शनाजी म. सा., प. पू. विराग दर्शनाजी म. सा., साध्वी चंदनाजी म. सा., अक्षयज्योती म. सा., चरण रत्ना म. सा., विराग रत्न म. सा., जितेंद्र मुनीश्री म. सा., प्रभव मुनीश्री म. सा., प्रशमीत मुनीश्री म. सा., जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, मुख्य सचिव नरेंद्र छाजेड, संयोजक राजेंद्र बाठिया, अशोक गुंदेचा, ललीत गुंदेचा, मंदिर व स्थानकांचे विश्वस्त आदी उपस्थित होते.
जीवनात क्षमा, प्रेम, शांती या भावनांना खूप महत्त्व आहे. ज्या दिवशी आपण रागवतो तो दिवस वाईट जातो, तर ज्या दिवशी रागवत नाही तो दिवस छान जातो. जीवनात क्षमा करणे आणि रागावणे या दोहोंचे परिणाम सर्वांनीच अनुभवलेले असतात. माणूस रागवतो तेव्हा त्याच्या अहंकाराला ठेच पोहोचते आणि तो दुसऱ्याला दुखावतो.
आपण कळत-नकळतपणे अनेकांना दुखावलेले असते. त्या सर्वांची क्षमापनाच्या निमित्ताने माफी मागायची आहे; तसेच एकमेकांना माफही करायचे, असे ललीतप्रभजी म. सा. यांनी सांगितले.
क्षमा केल्याने प्रसन्नता लाभते. क्षमा करणाऱ्याच्या व्यक्त
चेतनामध्ये बदल तर जाणवतोच; पण अव्यक्त चेतनांमध्येही बदल जाणवतो, असे प. पू. अक्षय दर्शनाजी म्हणाल्या.
जितो नेहमी समाजाला एकत्र आणण्याचे काम करते आहे. क्षमापना कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. जितो वर्षभर अनेक कार्यक्रम व उपक्रम राबवत असते. या कामात सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभते, असे जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.
जितोच्या वतीने उपस्थित महिलांना ‘सफल जीवन का सिक्रेट’ आणि पुरुषांना ‘बदले सोच, बदले विचार’ हे पुस्तक भेट देण्यात आले.