भाववाढीच्या दप्तराचे ओझे पालकांच्या खांद्यावर
By admin | Published: June 13, 2016 03:13 AM2016-06-13T03:13:46+5:302016-06-13T03:13:46+5:30
शैक्षणिक फीवाढीमुळे आधीच हैराण झालेल्या पालकांना नव्या शैक्षणिक वर्षात शालेय खर्चाचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येणार आहे.
दत्ता म्हात्रे,
पेण- राज्यभरातील शाळांच्या शैक्षणिक फीवाढीमुळे आधीच हैराण झालेल्या पालकांना नव्या शैक्षणिक वर्षात शालेय खर्चाचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यास दोन दिवस बाकी असतानाच गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ झाली असून या खरेदीचे बजेट सांभाळण्यासाठी पालकांची बेरीज- वजाबाकी सुरू झाली आहे. गणवेश १० टक्क्यांनी महागले असून महागाईचा निर्देशांक सतत चढत आहे.
वाहतुकीचे वाढलेले दर आणि मजुरांची संख्या घटल्याने कपडा व शिलाईमुळे गणवेश महागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यावर आकारण्यात आलेल्या वेगवेगळ्या करांचा भार आणि वीज दरवाढीमुळे गणवेशाची किंमत वाढविण्यात आली आहे. गतवर्षी ज्या गणवेशासाठी ५०० रुपये खर्च येत होता त्यासाठी आता ५५० ते ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. अनेक शाळा आणि दुकानदारांचे संगनमत असल्याने पालकांना ठरावीक दुकानदारांकडून गणवेश खरेदी सक्ती केली जात असल्याने त्यांचा भुर्दंडही पालकांना सहन करावा लागत आहे. शालेय शैक्षणिक साहित्यातही भाववाढ झाल्याचे चित्र दिसत असून कंपास बॉक्स, प्रयोग साहित्य, प्रयोगवह्या यांच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. वॉटर बॉटल, लंच बॉक्स यांच्याही किमती वाढल्या आहेत. ज्या वॉटर बॉटल १५ ते ७५ रुपयांना मिळत होत्या त्यासाठी आता २० ते १०० रुपये आकारण्यात येत आहेत. छोट्या विद्यार्थ्यांसह माध्यमिक व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खास शैलीतील लंच बॉक्स हवे असतात. या आवडीच्या मागणीसाठी आता जादा ५० ते १०० रुपये खर्च करावे लागत आहेत.
राज्य शिक्षण मंडळाच्या सहाव्या इयत्तेच्या पुस्तकाची छपाई नव्याने करण्यात आल्याने परिणामी पुस्तकाच्या किमती तिपटीने वाढल्या आहेत. १५ रुपयांना उपलब्ध असलेले पाठ्यपुस्तक यंदा ३३ ते ४५ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. वह्यांच्या डझनाच्या दरात दोन टक्के वाढ झाली असून ब्रँडेड कंपन्यांच्या वह्या आकर्षक कव्हरमुळे महागलेल्या आहेत. (वार्ताहर)
>दप्तरांच्या किमतीत वाढ
गतवर्षीच्या तुलनेत दप्तरांच्या किमतीत पंधरा टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी दप्तरासाठी २५० ते ५०० रुपये मोजावे लागत होते त्या दप्तरासाठी आता ३५० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. शालेय दप्तरासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने दप्तरावरील आकर्षक डिझाईनचा समावेश करण्यात आल्याने किमती वाढल्याचे विक्रे ते सांगतात.