पालकांचा संताप
By Admin | Published: July 22, 2016 12:57 AM2016-07-22T00:57:12+5:302016-07-22T00:57:12+5:30
अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरू असून, विद्यार्थी व पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना गुरुवारी घेराव घातला.
पुणे : अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरू असून, विद्यार्थी व पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना गुरुवारी घेराव घातला. परिणामी, शिक्षण विभागाला पोलिसांना पाचारण करावे लागले. यामुळे या कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. आॅनलाईन पद्धतीने प्रवेश देणे बंधनकारक असताना काही कनिष्ठ महाविद्यालयांकडून आॅफलाईन प्रवेश दिले जात असल्याचा दावा पालकांकडून केला जात आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे आमच्या मुलांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत कॉलेज सुरू करू नका, अशीही मागणी पालक करीत आहेत.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रकियेच्या चार फेऱ्या घेण्यात आल्या. मात्र, चुकीचा पसंतिक्रम दिल्याने दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला, प्रवेश मिळूनही प्रवेश घेतला नाही तसेच प्रवेशासाठी अर्जच केला नाही, असे सुमारे ७ ते ८ हजार
विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. बुधवारी शेकडो पालक-विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
परंतु, पुढील प्रवेश फेरी घेण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त न झाल्याने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे गुरुवारीही पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गोंधळ घातला.
शासनाच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिक कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात केवळ आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात आहेत. मात्र, काही महाविद्यालयांकडून ५० हजार ते एक लाख रुपये घेऊन आॅफलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात असल्याचा आरोप शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केलेल्या पालकांकडून केला जात होता. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याबाहेरून आलेल्या काही विद्यार्थ्यांनासुद्धा पैसे घेऊन आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देण्याचे आमिष दाखविले जात आहे. (प्रतिनिधी)
>आजच प्रवेश मिळाला पाहिजे
अकरावीत प्रवेश न मिळाल्याने आमची मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतील; त्यामुळे त्यांना आजच्या आजच प्रवेश द्या. प्रवेशप्रक्रियेतील त्रुटी तत्काळ दूर करा. नोकरी सोडून प्रवेशासाठी आम्हाला आमचा दिवस वाया घालावा लागत आहे. देशात लोकशाही आहे; त्यामुळे पोलीसही आमच्या अंगाला हात लावू शकत नाहीत. प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयाचा परिसर सोडणार नाही आणि अधिकाऱ्यांना घरी जाऊ देणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांकडूनव्यक्त केल्या जात होत्या.
आमची मुले
प्रचंड तणावाखाली
आमच्या मुलांचे मित्र सोमवारपासून कॉलेजमध्ये जात आहेत. मात्र, प्रवेश न मिळाल्याने आमच्या मुलांना कॉलेजमध्ये जाता येत नाही. महाविद्यालयांकडून आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे. चार फेऱ्या घेऊनही मुलांना घराजवळचे कॉलेज मिळाले नाही. खडकी येथे राहणारा मुलगा कोंढव्यातील कॉलेमध्ये कसा जाऊ शकेल? महाविद्यालयातील रिक्त जागांवर तत्काळ प्रवेश देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात होती.