मुलांची हत्या करून आई-वडिलांची आत्महत्या

By admin | Published: April 23, 2015 02:16 AM2015-04-23T02:16:25+5:302015-04-23T02:16:25+5:30

अकोल्यातील घटना : शेतकरी कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; गूढ कायम.

Parental suicides by killing children | मुलांची हत्या करून आई-वडिलांची आत्महत्या

मुलांची हत्या करून आई-वडिलांची आत्महत्या

Next

पातूर/ शिर्ला/खानापूर (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील आस्टुल येथील एका शेतकरी कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह मंगळवारी शेतात आढळून आले. मुलांची हत्या करून आई-वडिलांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन मुलींचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले असले तरी, इतर मृत्यूंचे गूढ कायम आहे. शेतकरी संजय पूर्णाजी इंगळे (वय ४५), त्यांची पत्नी मनीषा (३५), मुलगी ऐश्‍वर्या (१९), मयूरी (१७) आणि मुलगा रोशन (१५) असे मृतांचे नाव आहे. संजय इंगळे यांनी वडिलोपार्जित ३५ एकर बागायती शेतीमध्ये संत्र्याची बाग आणि भुईमूग पेरला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे कुटुंबातील सदस्य दररोज शेतात जायचे. मंगळवारी सकाळी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांना नेहमीप्रमाणे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी मोटारसायकलने जाताना ग्रामस्थांनी पाहिले. त्यांचा हा नित्यक्रम असल्याने कुणालाही शंका आली नाही. त्यानंतर सकाळी गावातील एक मुलगा शेताकडे पिकांना पाणी देण्यासाठी गेला असता, त्याला पाच जणांचे मृतदेह आढळून आले. पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत, तर दोन मुलींचे मृतदेह शेतात पडलेले आढळले. नवव्या वर्गात शिकणार्‍या रोशनचा मृतदेह जमिनीवरून हात पुरेल एवढय़ा अंतरावरील फांदीला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. मयूरीचा ओढणीने गळा आवळलेला आढळून आला, तर दुसरी मुलगी ऐश्‍वर्यालाही गळा दाबून ठार केल्याचे दिसून येत होते. आंब्याच्या दुसर्‍या झाडाला पती-पत्नीचे मृतदेह लटकलेले होते. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतांवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान , पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांनी दोन मुलींचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात नमूद झाले असल्याचे सांगीतले. इतर तिघांचा गळफासामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. पोलीस सर्वच बाजूंनी तपास करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*आजीमुळे स्नेहा बचावली

      संजय इंगळे यांचे वडील पूर्णाजी इंगळे अकोला येथे राहतात. संजय यांना तीन मुली होत्या. त्यांच्यासह मुलगा शिक्षणासाठी आजोबांकडेच राहत होता. १४ एप्रिलला भीमजंयतीनिमित्त दोन मुली व मुलगा आस्टुलला आले होते. मुलगी स्नेहा मात्र आजीची तब्येत बरोबर नसल्याने गावी आली नाही. त्यामुळे तिचे प्राण वाचले.

*घटनेमागे संपत्तीचा वाद?

       संजय इंगळे यांच्यासह कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचे कारण गूढ आहे. सकृतदर्शनी दोन मुलींच्या हत्येनंतर आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. तथापि, या घटनेमागे संपत्तीच्या वादासह इतर काही कारणं आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Parental suicides by killing children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.