आंतरजातीय विवाहावरून आई-वडिलांचा गोंधळ

By admin | Published: January 12, 2016 12:53 AM2016-01-12T00:53:53+5:302016-01-12T00:54:07+5:30

आॅनर किलिंग विरोधी परिषदेतील प्रकार

Parents' confusion over inter-caste marriages | आंतरजातीय विवाहावरून आई-वडिलांचा गोंधळ

आंतरजातीय विवाहावरून आई-वडिलांचा गोंधळ

Next

कोल्हापूर : आॅनर किलिंग विरोधी परिषदेत करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाहावर संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी आक्षेप घेतला. शिवाय परिषदेच्या ठिकाणी सोमवारी दुपारी गोंधळ घातला. सुमारे दीड तास चाललेल्या या प्रकारामुळे राजर्षी शाहू स्मारक भवनच्या परिसरात तणाव निर्माण झाला.
येथील शहीद गोविंद पानसरे विचार मंचतर्फे संबंधित परिषद आयोजित केली होती. यामध्ये आकाश कांबळे व सोनाली कल्याणकर यांचा आंतरजातीय विवाह करण्यात आला. विवाह झाल्याचे समजताच या ठिकाणी सोनालीचे आई आणि वडील दाखल झाले. शिवाय त्यांनी या विवाहावर आक्षेप घेत आक्रमक भूमिका स्वीकारत त्यांच्या मुलगीला परत नेण्याची भूमिका घेतली. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिषदेसाठी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना सभागृहाखाली थांबवून समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. विवाहाबाबत चर्चा सुरू असताना अचानकपणे कसा विवाह करण्यात आला, सोनालीचे आम्ही कोण आहोत की नाही? अशी विचारणा करत मुलीच्या आई-वडिलांनी उपस्थितांशी वाद सुरू केला. त्यांची आक्रमकता पाहून दक्षता म्हणून परिषदेच्या संयोजकांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस आल्यानंतर आई-वडिलांनी त्यांच्यासमोरदेखील

या विवाहाला हरकत घेतली. त्यांच्याकडून काहीजणांना शिवीगाळही केली. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढून गोंधळात आणखी भर पडली. अखेर परिषदेचे संयोजक, कार्यकर्त्यांनी पोलिसांना या आई-वडिलांना तेथून घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानुसार पोलीस त्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. (प्रतिनिधी)

पोलीस-संयोजकांत वाद
आंतरजातीय विवाह पार पडल्यानंतर मुलीच्या आई-वडील व काही नातेवाईकांनी शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रमात घुसून आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला. कार्यक्रमाच्या ठिकाणीच शिवीगाळ व हातघाई सुरू झाल्याने या प्रकाराची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना देण्यात आली. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीचे आई-वडील पोलिसांसमोरच संयोजकांना शिवीगाळ करत होते. या प्रकाराने संतप्त झालेले शहीद पानसरे युवा मंचचे सतीशचंद्र कांबळे सभागृहाबाहेर आले. त्यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांना तुम्ही बघत काय बसलाय, त्यांना अटक करा, अशी विनंती केली. त्यावरून चव्हाण यांनी तुम्ही आदेश सोडणारे कोण? असा उलट प्रश्न केल्याने कांबळे व पोलिसांच्यात सुमारे अर्धा तास शाब्दिक चकमक उडाली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
—————————
‘त्या’ दाम्पत्याकडून पोलिसांना शिवीगाळ
कार्यक्रमस्थळावरून मुलीच्या आई-वडिलांना पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी आम्ही काय चोरी केली आहे काय? कार्यक्रमस्थळी ‘मुलीचे आई-वडील ऐकतात का बघा, नाही तर त्यांना उघडे करून मारा,’ असे एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणत होता. तो कोण, त्याचा बक्कल नंबर सांगा म्हणून दोघांनी गोंधळ घातला. यावेळी पोलीस शांत बसून होते. आपले कोण ऐकत नाही या रागापोटी मुलीच्या आईचा पारा चढला. तिने थेट पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे काही पोलीस संतापून तिच्या तोंडाला लागले. अखेर दुसऱ्याच्या घरचा वाद आपल्या घरी नको, म्हणून पोलिसांनी नमते घेत ‘त्या’ दाम्पत्याला पोलीस ठाण्याबाहेर घालविले.

माहिती दिली होती
आकाश आणि सोनाली यांच्या विवाहाची सोनालीच्या आई-वडिलांना माहिती दिली होती. मात्र, तरीही त्यांनी हा विवाह होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. कायदेशीर बाबींची पूर्तता करून आकाश व सोनालीचा विवाह करण्यात आला आहे. त्यांना संरक्षण मिळावे यासाठी पोलिसांकडे अर्ज करणार आहे. शिवाय संबंधित आई-वडिलांची नम्रतापूर्वक समजूत काढणार असल्याचे वर्ल्ड फेडरेशन आॅफ यूथचे उपाध्यक्ष गिरीश फोंडे यांनी सांगितले.

Web Title: Parents' confusion over inter-caste marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.