पालकांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका!
By admin | Published: May 4, 2017 05:02 AM2017-05-04T05:02:25+5:302017-05-04T05:02:25+5:30
दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यावर बोर्डातर्फे उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, महाराष्ट्र राज्य शिक्षण
मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यावर बोर्डातर्फे उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे अद्याप दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. व्हॉट्सअॅप, सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजेसमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बोर्डाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या अखेर बारावीचा तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल असल्याच्या निकालाच्या तारखांचे मेसेजेस फिरत आहेत. या तारखा चुकीच्या
आणि अनधिकृतपणे व्हॉट्सअॅपवर फिरत असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम अद्याप सुरू आहे. त्यानंतर निकालाची अन्य कामे पूर्ण करण्यात येतील. निकालाची सर्व कामे पूर्ण झाल्यावर प्रसारमाध्यमांना निवेदन देऊन निकालाच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्याचबरोबर बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही निकालाच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे बोर्डाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)