ट्रॉलीवरचा संसार; आई-वडिलांनी फडात राबून लेकरांना शिकविले; आता नोकरीअभावी पदवीधरही ऊस तोडायलाच निघाले !
By appasaheb.patil | Published: November 16, 2019 12:31 PM2019-11-16T12:31:46+5:302019-11-16T12:35:12+5:30
बिºहाड टाकले बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रॉलीत : कुत्र्यांसह जिवलग पाळीव प्राण्यांनाही घेतले सोबतीला !
सुजल पाटील
सोलापूर : आम्ही गाव सोडून दुसºया जिल्ह्यात अन् परराज्यात जात आहोत़़़ भटकंती हेच आमचे जीवन बनले आहे... आता गॅस शेगडीऐवजी तीन दगडाच्या चुलीवरचा संसार सुरू होणाऱ़़ कुणाच्या शेतात काम करायचं अन् कुठं राहायचं हे ठाऊक नाही.. कोणत्याही गोष्टीची अडचण होऊ नये, यासाठी घरातील मिळेल ते संसारोपयोगी साहित्य घेऊन आम्ही या प्रवासाला निघालो़ पण कोणत्याही परिस्थितीत काम करून आपला प्रपंच चालविण्यासाठी आम्ही कर्नाटकात जात आहोत... मात्र तिथं कोणत्या गावात अन् कोणत्या शेतात हेही ठाऊक नाही.. तिथं गेल्यावर आमचं खरं जीवन कळेल...पण साहेब एवढेच सांगतो की, आता शेतशिवारात भटकंती ही आमच्या पाचवीला पुजलेलीच.. हे बोल आहेत बीड, परभणी, नांदेड, जालना, अहमदनगर येथील ऊसतोड कामगारांचे.
ट्रॉलीतील संसार या मथळ्याखालचे वृत्तांत घेण्यासाठी ‘लोकमत’चा चमू दुपारी तीन वाजता तुळजापूर नाक्यावर पोहोचला़ तुळजापूर महामार्गावरून शहराच्या दिशेने येणाºया एकामागून एक ट्रॅक्टर ट्रॉलीमधील ऊसतोड कामगारांचा जथ्था दिसत होता़़ भल्या पहाटे शहर शांत झोपलेले असतानाच या ट्रॉलीची रेलचेल सुरूच होते़ ती मध्यरात्री उशिरापर्यंत चालते़ दुपारी तीनच्या सुमारास येणाºया ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सहा महिन्यांच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच कुटुंबीय दिसले़ एवढेच नव्हे तर आपल्या जिवलग पाळीव प्राणी कोंबडी, कुत्रे, गाय, ऊसतोडणीसाठी लागणारे कोयते, दळणवळणासाठी लागणारी मोटरसायकल, झोपण्यासाठी लागणारे अंधरुण, पांघरुण, पलंग, चटई, तात्पुरत्या निवाºयासाठी लागणारी ताडपत्री, तुराटी, बांबू यासोबत पाण्यासाठीच्या घागरी, ड्रम तसेच चार ते पाच महिने पुरेल एवढे धान्य घेऊन हे ऊसतोड कामगार साखर कारखान्यांच्या दिशेने जातानाचे दृष्य पाहावयास मिळाले़ राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामास डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर सर्वच कारखान्यांनी साखर आयुक्तालयाची परवानगी घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे़ ज्या ज्या कारखान्यांना गाळप परवाना मिळाला त्या त्या कारखान्यांनी आपापल्या ऊसतोड कामगारांच्या तोड्यांना कारखाना परिसरात येण्याचे आमंत्रण दिले़ त्यानुसार बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर आदी भागातील ऊसतोड कामगार कारखाना परिसरात जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.
उच्चशिक्षितही झाले ऊसतोड कामगार..
- दुपारी तीनच्या सुमारास ‘लोकमत’चा चमू तुळजापूर नाक्यावर थांबला असता तुळजापूरहून कर्नाटकातील बेळगीकडे जाणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीतील ऊसतोड कामगारांशी संवाद साधला़ यावेळी पदव्युत्तर शिक्षण घेतलेला शिवप्रसाद रामजी कोळेकर, पदवीचे शिक्षण घेत असलेले राहुल अंकुशराव वानखेडे, दत्ता लिंबाजी वंजारी, प्रताप गोविंद गव्हाणे हे विद्यार्थी ऊसतोड मजूर म्हणून कामावर जात असल्याचे दिसून आले़ यावेळी बोलताना शिवप्रसाद कोळेकर म्हणाला की, पदवीचे शिक्षण घेऊन तीन ते चार वर्षे झाली, नोकरी मिळाली नाही. मग शिकून काय उपयोग म्हणून मी आमच्या आई-वडिलांसोबत ऊसतोडीसाठी जात असल्याचे सांगितले़ याचवेळी अन्य युवक व युवतींनी बेरोजगारीविषयी पोटतिडकीने ‘लोकमत’समोर आपली भूमिका मांडली़
आम्ही बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात असलेल्या नित्रुड गावचे रहिवासी आहोत़ आमच्या या ट्रॉलीत दहा ते बारा कुटुुंबातील लहान मुलांसह वृद्धांपर्यंतचे लोक आहेत़ मागील तीन दिवसांपासून आम्ही प्रवास करीत आहोत़ कर्नाटकातील बेळगी या गावाजवळील साखर कारखान्याकडे जात आहोत़ राज्यात दुष्काळ, बेरोजगारीचा प्रश्न फारच गंभीर बनला आहे़ त्यामुळे भटकंती हीच आमच्या नशिबात मरेपर्यंत राहणार की काय, अशी अवस्था आहे़ ऊसतोड कामगारांच्या विकासासाठी शासनाने पुढाकार घ्यावा़
- शरद विठ्ठल पवार,
ऊसतोड कामगार, माजलगाव, ता. बीड
ऊसतोडीसाठी तीन ते चार महिने आम्ही गाव सोडतो़ ऊसतोडीनंतर बिगारीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो दुष्काळामुळे शेतीची कामे नाहीत. महागाईमुळे बांधकामावर काम मिळेना. त्यामुळे नाइलाजास्तव ऊसतोडीसाठी गाव सोडावे लागत आहे़ दिवसाला तीनशे ते चारशे रुपये मिळतात़ त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतोय़ माझी पत्नी, मुलं माझ्या ऊसतोडणीच्या कामात मदत करतात़ शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे़
- बाळासाहेब सोमा राठोड,
रा़ नित्रुड, ता़ माजलगाव, जि़ बीड
दररोज दोनशे ते अडीचशे ट्रॅक्टर ट्रॉली जातात भरून
- काही दिवसांत साखरेचा गाळप हंगाम सुरू होणार आहे़ त्या दृष्टीने मराठवाड्यातील बीड, परभणी, औरंगाबाद, जालना, नांदेड, धुळे आदी परिसरातून ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉल्या या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांबरोबरच इतर राज्यातील साखर कारखान्यांकडे जात आहेत़ मराठवाड्यातून कर्नाटक, आंध्रप्रदेश व पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी सोलापूरमार्गे नियमित दोनशे ते अडीचशे ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊसतोड कामगार जात असल्याची माहिती वाहतूक पोलीस कर्मचाºयांनी सांगितले.
जिथं पाणी तिथं मुक्काम...
- मराठवाड्यातील विविध भागातून येणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीमधील ऊसतोड कामगारांची भटकंती नेहमीचीच़ ऊसतोडीसाठी निघाल्यानंतर गावातून कारखाना परिसरात पोहोचेपर्यंत किमान सहा ते सात दिवस लागतात़ या सहा ते सात दिवसांच्या कालावधीत कामगार आपले जेवण आपणच तयार करून खातात़ रात्र झाली की जिथं पाणी आहे तिथं मुक्काम हा फिक्सच असतो़ मुक्कामाच्या ठिकाणी ना वीज असते अन्य सेवासुविधा़.. रॉकेलच्या चिमणीतील प्रकाशावरच रात्र निघून जाते़ दिवस उजाडला की, पुन्हा ऊसतोडी मार्गस्थ हे नित्याचेच बनले आहे़