“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 07:02 PM2024-09-21T19:02:05+5:302024-09-21T19:04:49+5:30
Parivartan Mahashakti Aghadi News: संजय राऊतांनी अभ्यासपूर्ण बोलावे. देशाला आदर्शवत ठरेल, असे राज्य उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
Parivartan Mahashakti Aghadi News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. एकाबाजूला महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपाच्या बैठकांना वेग आला असून, दुसरीकडे आरक्षणाचे मुद्दे अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यातच राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी आकाराला येत आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रहार जनशक्तीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देत, महाशक्तीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला आहे.
केंद्रात किंवा राज्यात जे सत्तेत असतात, त्यांना काही अडचणीचे विषय असतात. मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल, यासाठी काम करतात. आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो. खरे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे. परंतु, महाविकास आघाडीची मते थोडीफार काही कमी करता आली, तर त्यासाठी नवनवीत आघाड्या स्थापन केल्या जात आहेत. त्यासाठी पदांचा आणि पैशांचा वापर करायचा, असे धोरण यातून दिसत आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेचा बच्चू कडू यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
आम्हाला कुणाला पाठिंबा देण्याची गरजच पडणार नाही
संजय राऊतांची जहागिरी नाही. त्यांचा अभ्यास कमी पडतो. संजय राऊत यांनी अभ्यासपूर्ण बोलावे. तुम्हाला जी काही लढायची इच्छा आहे, ते तुमच्या गटातून लढावे. संजय राऊत जे बोलतायत, ते आमच्याकडून शक्य नाही. आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ. आम्हाला कुणाला पाठिंबा देण्याची गरजच पडणार नाही, असा मोठा दावा करत बच्चू कडू यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले.
महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबुतीने दिसेल. संपूर्ण देशाला आदर्शवत ठरेल, असे राज्य उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, सर्वांच्या समोर उमेदवार देणार. मजबुतीने देणार. आम्ही सर्व २८८ जागांवर लढणार, असे बच्चू कडू यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
दरम्यान, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आ. बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे या नेत्यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा केली. महाशक्तीचा एकत्रित मेळावा येत्या २६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या आघाडीत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच ‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे सामील होतील, अशी आशा या नेत्यांनी व्यक्त केली.