पार्किंगचा खेळखंडोबा !

By admin | Published: January 6, 2015 01:03 AM2015-01-06T01:03:27+5:302015-01-06T01:03:27+5:30

दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगच्या माध्यमातून कधीही असामाजिक तत्त्व आपला हेतू साध्य करू शकतात

Parking game segment! | पार्किंगचा खेळखंडोबा !

पार्किंगचा खेळखंडोबा !

Next

घातपातास पोषक : प्रशासनाची उदासीनता, ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ झोपेत
दयानंद पाईकराव - नागपूर
दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगच्या माध्यमातून कधीही असामाजिक तत्त्व आपला हेतू साध्य करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पॅसेंजर लाऊंजच्या शेजारीच नव्हे तर अक्षरश: जेथून रेल्वेगाड्या ये-जा करतात त्या रेल्वे रुळाच्या बाजूलाही दुचाकी उभ्या करण्यात येत असल्यामुळे तेथे कधीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत रेल्वे प्रशासन कमालीची उदासीनता दाखवित असून रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ सुद्धा बेफिकीर असल्याचे दिसत आहे.
नागपूर रेल्वेस्थानक हे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. परंतु येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. रेल्वेस्थानकावर पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. रेल्वे रुळावरूनही दुचाकी चालवत जाण्याचे प्रमाण वाढीस लागले असून रेल्वे प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. रेल्वेस्थानकाच्या देखभालीसाठी ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ची स्थापना दोन वर्षापूर्वी करण्यात आली. या कमिटीने सुरुवातीला नियमित बैठका घेऊन रेल्वेस्थानकावरील बाबींचा नियमित आढावा घेतला. परंतू आता ही समितीदेखील रेल्वेस्थानकाच्या बाबतीत उदासिन झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकुणच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
रेल्वे रुळाच्या बाजूलाच पार्किंग
‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ स्थापन केल्यानंतर या कमिटीने पत्र काढून लोहापुलाकडील उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला पत्र देऊन तेथे रेल्वे रुळाच्या शेजारी दुचाकी उभ्या करू नये, असे फर्मान सोडले. सुरुवातीला या पत्राचे पालनही झाले. परंतु मागील वर्षभरापासून रेल्वे रुळाच्या बाजूलाच दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे एखाद्या असामाजिक तत्त्वाने दुचाकीत स्फोटके ठेवून ती रेल्वे रुळाच्या बाजूला उभी केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. परंतु तरीसुद्धा या गंभीर बाबीकडे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.
पॅसेंजर लाऊंजशेजारी उभ्या राहतात दुचाकी
रेल्वे सुरक्षा दलाच्या बाजूला भव्य पॅसेंजर लाऊंज तयार करण्यात आले आहे. येथे प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या आणि पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या पॅसेंजर लाऊंजला लागूनच दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. येथेही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. पार्किंगची जागा नसताना येथे खुशाल दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. परंतु यावर रेल्वे प्रशासन किंवा सुरक्षा यंत्रणाही मूग गिळून गप्प असल्याची स्थिती आहे. भविष्यातील संभाव्य धोका ओळखून तातडीने यावर पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा कुठल्याही प्रसंगी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पार्किंगची समस्या सोडविण्यात अपयश
रेल्वेस्थानकावर पार्किंगची समस्या अतिशय बिकट झाली आहे.रेल्वे सुरक्षा दलासमोर शासकीय वाहनांच्या पार्किंगमध्ये जवळपास ३०० दुचाकी उभ्या करण्यात येत होत्या. परंतु या परिसरातून वर्षभरात १२ ते १४ दुचाकी चोरीला गेल्या. त्यामुळे ही डोकेदुखी बंद करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी येथील सगळ्या दुचाकी तेथून हटवून कारवाई सुरू केली. सध्या ही जागा रिकामी आहे. येथे आरपीएफचे चारचाकी वाहन उभे राहत असून इतर जागा रिकामी राहते. येथे रेल्वे प्रशासनाने अधिकृत पार्किंगचे कंत्राट दिल्यास किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना तेथे वाहने उभे करण्याची मुभा दिल्यास बऱ्याच जणांचा पार्किंगचा प्रश्न निकाली निघणार आहे.
रेल्वे रुळ ओलांडून जातात दुचाकी
रेल्वेस्थानकाच्या आत वाहने चालविणे हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे. रेल्वे प्रशासनाने तसा नियमच घालून दिला आहे. परंतू पूर्वेकडील संत्रा मार्केट भागात असलेल्या गुड्स शेडकडून येणाऱ्या पायी रस्त्यावरून थेट दुचाकी पश्चिमेकडील भागात नेण्यात येतात. हा गंभीर प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. परंतु तरीसुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
संत्रा मार्केट भागातही वाहतूक विस्कळीत
रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केटकडील भागात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. येथे वाहतुकीचे नियम कोणताच वाहनचालक पाळत नसल्याचे दिसून आले. संत्रा मार्केटकडील भागात वाहनचालक वाटेल तेथे आपले वाहन उभे करून थेट रेल्वेस्थानकात प्रवेश करतात. तेथे ड्युटीवर असलेले पोलिसही या वाहनचालकांना कुठलाच मज्जाव करीत नाहीत. एखाद्या वेळी एखाद्या समाजकंटकाने घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने आपल्या वाहनात स्फोटके ठेवून निघून गेल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. परंतू याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संत्रा मार्केटकडील भागात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Parking game segment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.