वाहनतळ धोरण पुन्हा अडचणीत
By Admin | Published: April 4, 2017 02:58 AM2017-04-04T02:58:30+5:302017-04-04T02:58:30+5:30
वादग्रस्त ठरल्यामुळे लांबणीवर पडलेले वाहनतळ धोरण रविवारपासून प्रशासनाने परस्पर लागू केले
मुंबई : वादग्रस्त ठरल्यामुळे लांबणीवर पडलेले वाहनतळ धोरण रविवारपासून प्रशासनाने परस्पर लागू केले आहे. याचे तीव्र पडसाद महापालिका महासभेत सोमवारी उमटले. इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगसाठी मासिक शुल्क वसूल करण्यास शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तर भाजपाने लोकांचे मत घेण्याचा आग्रह धरला आहे, तर काँग्रेसने मात्र या धोरणाला कडाडून विरोध केला आहे.
फोर्ट, कुलाबा येथील १८ वाहानतळांच्या शुल्कात चौपट वाढ तर इमारतींच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावरील पार्किंगसाठी शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली आहे. यावर बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी हरकतीचा मुद्दा महासभेत उपस्थित करत या धोरणाची माहिती मागवली. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले हे धोरण लागू करताना गटनेत्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते, अशी भूमिका भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मांडली.
घराजवळ रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या रहिवाशांकडून शुल्क घेण्यापूर्वी त्यांचे मत विचारात घ्यावे. जुन्या वसाहतींमध्ये वाहनतळांची सोय नसल्याने पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पार्किंगच्या आड सुरू असलेल्या बेकायदा धंद्यांना लगाम लावण्यासाठी हे धोरण असल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले. तर हा मुंबईतील नागरिकांना लुटण्याचा प्रकार आहे. ६१ हजार रुपये बँकेत साठवून शुल्क वसूल करणे चुकीचे आहे, असा संताप काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
>पार्किंग सोय तीनशे ठिकाणी
मुंबईत ९१ ठिकाणी पार्किंग असून ही पार्किंग ३०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यावर पार्किंग शुल्कवाढीच्या प्रस्तावाला २०१५ ला सुधार समिती व सभागृहात मंजुरी मिळाली होती. त्यानुसार शुल्क दरवाढ लागू करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
भाजपाचा काँग्रेसला टोला
काँग्रेसला पार्किंग धोरण नको तर बेकायदा पार्किंग पाहिजे आहे, असा टोला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी लगावला.
>येथे झाली शुल्कवाढ
फोर्ट बायलेन एरिया १ आणि २, वालचंद हिराचंद रोड १ आणि २, शिवसागर राम गुलाम मार्ग, पी. एम. रोड, रामजी कमानी (पश्चिम), रिगल सिनेमा, एम. जी रोड (पश्चिम), बॉम्बे हॉस्पिटल, जे. एन. हरदिया मार्ग, रामजी कमानी (पूर्व), अदी मर्झबान रोड, एमजेपी मार्केट परिसर नंबर १, २ आणि ३, एम. जी. रोड, बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, नरोत्तम मोरारजी मार्ग, हुतात्मा चौक नंबर ३, इरॉस चित्रपटगृहासमोरील वाहतूक बेट, नाथीबाई ठाकरसी मार्ग
>नवे धोरण : दुचाकी वाहन उभे करण्यासाठी प्रती तास ५ ते १५ रुपये, चारचाकीसाठी २० ते ६० रुपये, तासाहून अधिक काळ वाहनतळावर वाहन राहिल्यास ५ रुपयांच्या पटीत शुल्कवाढ. निवासी वाहनतळ योजनेनुसार इमारतीबाहेरील रस्त्यावर दिवसा वाहन उभे करण्यासाठी ३ हजार ९६० रुपये, तर रात्रीच्या वेळेसाठी १ हजार ९८० रुपये मोजावे लागतील.
>महिला बचतगट, दिव्यांग, सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य
जुन्या ठरावाची आठवण करून देत महिला बचतगट, अपंग आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना वाहनतळांचे कंत्राट मिळणार का, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी विचारला. यावर दुजोरा देत नव्याने निविदा मागवून त्यात महिला बचतगट, दिव्यांग आणि सुशिक्षित बेरोजगारांना सामावून घेण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिले.