परळीतील दगडफेकीची पोलिसांकडून चौकशी
By Admin | Published: June 8, 2014 02:14 AM2014-06-08T02:14:45+5:302014-06-08T02:14:45+5:30
दगडफेक यांसारख्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली का, याची महाराष्ट्र पोलीस खात्याने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
>गोपीनाथ मुंडेंचे अंत्यसंस्कार : परिस्थितीचे आकलन कमी पडले का?
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या परळीत झालेल्या अंत्यसंस्कारांच्या वेळी शोकाकुल जनसमुदायाच्या तीव्र भावनांची पूर्वकल्पना घेऊन त्यातून नंतर घडलेल्या घोषणाबाजी व दगडफेक यांसारख्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली का, याची महाराष्ट्र पोलीस खात्याने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांची मोठी संख्या व त्यांच्या मुंडेंविषयी असलेल्या तीव्र भावना लक्षात घेता घोषणाबाजी व दगडफेक यांसारख्या घटना घडू शकतात याची पूर्वकल्पना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना आली होती का व अशा अप्रिय घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलली गेली होती का याविषयीचा लेखी अहवाल त्या दिवशी (4 जून) परळीत नेमणुकीवर असलेले पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे, असे राज्य पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’ला सांगितले. हा ‘आयपीएस’ अधिकारी म्हणाला की, त्या दिवशी जे काही घडले त्याची तपशीलवार माहिती देणारा तसेच दगडफेक होऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय केले गेले होते का याचीही नोंद असलेला अहवाल देण्यास तेथे हजर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिका:यांना सांगण्यात आले आहे. या अहवालाची शहानिशा करून तो पोलीस महासंचालकांना सादर केला जाईल.
परळीतील त्या दिवशीची परिस्थिती हाताळण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली असे अहवालातून दिसून आले तर, भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी, आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला.
मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी त्या शोकाकुल अवस्थेतही स्वत: माईक हातात घेऊन कार्यकत्र्याना खुद्द मुंडेंची शपथ घालून शांत केले होते; तसेच त्यांनी या घटनेच्या चौकशीचीही मागणी केली होती.
यासंदर्भात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाला की, गेल्या काही वर्षात राज्यात अशाच प्रकारे अफाट लोकप्रियता असलेल्या इतरही काही राजकीय नेत्यांचे (विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे) निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळीही असाच लाखोंचा जनसागर लोटला होता. परंतु त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताच प्रश्न निर्माण झाला नाही. परंतु मुंडे यांचा अचानक झालेला मृत्यू कार्यकत्र्याच्या दृष्टीने धक्कादायक होता व त्याच धक्क्याचे पर्यावसान अंत्यविधीच्या वेळी काही प्रमाणात संतापात झालेले असू शकते.