परळी, साताऱ्यातील विजय राष्ट्रवादीला पराभव विसरायला लावणारा !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 05:21 PM2019-10-24T17:21:27+5:302019-10-24T17:23:25+5:30
राष्ट्रवादी काँग्रेससाठी सातारा आणि परळीतील विजय विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा विसर पाडणारा ठरला आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षांतर झाले. अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष गलीगात्र झाला होता. आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचणे पुन्हा एकदा शक्य झाले नाही. मात्र परळी आणि साताऱ्यातील विजय आघाडीला राज्यात झालेला पराभव विसरायला लावणार ठरला आहे. सातारा आणि परळीतील भाजपच्या पराभवाचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
2019 लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून विजयी झाल्यानंतरही छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेसोबतच सातारा लोकसभा निवडणुकीची पोटनिवडणूक होणार हे निश्चित होते. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील जागा जिंकण्यासाठी खुद्द शरद पवारच मैदानात उतरले होते. एकीकडे शरद पवार आणि दुसरीकडे उदयनराजे भोसले यामुळे ही लढत महाराष्ट्रात फारच चर्चीली गेली होती.
दरम्यान शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्यासाठी मुसळधार पावसात घेतलेली सभा राज्यभरात चर्चीली गेली. या सभेमुळे साताऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्रात भावनिक लाट केवळ आली होती. या सभेचा पुरेपुर लाभ पाटील यांना झाला. सातारा लोकसभा राष्ट्रवादीने पुन्हा खेचून आणली. त्यामुळे राष्ट्रवादीत एक आनंदाची लहर आली आहे.
या लढती व्यतिरिक्त परळी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. अर्थात धनंजय मुंडे यांचं अस्तित्व परळीतून पणाला लागले होते. त्यातच अखेरच्या टप्प्यात भाजपकडून धनंजय मुंडे यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल करून भावनिक वातावरण निर्माण केले गेले होते. त्यावर धनंजय मुंडे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भावनिक लाट धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभी राहिली आणि त्यांचा विजय झाला. पंकजा यांचा पराभव राष्ट्रवादीसाठी सुखावणारा आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेससाठी सातारा आणि परळीतील विजय विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा विसर पाडणारा ठरला आहे.