बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:27 IST2024-11-23T09:03:43+5:302024-11-23T09:27:40+5:30
Parli Assembly Election 2024 Result Live Updates: महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे

बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
Parli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : बीड : विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. विशेष: मराठवाड्याच्या निकालाकडे. बीडच्या परळीमध्येधनंजय मुंडे विरूद्ध शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात मुख्य लढत बघायला मिळाली. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत बघायला मिळाली होती. मात्र, महायुतीमध्ये ही जागा धनंजय मुंडे यांच्याकडे गेली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. तर पंकजा मुंडे स्वत: धनंजय मुंडेंचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या.
आज सकाळी राज्यातील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काही दिग्गज आघाडीवर आहेत, तर काही पिछाडीवर पडले आहेत. परळीत धनंजय मुंडे हे ४००० मतांनी आघाडीवर आहे. तर राजेसाहेब देशमुख हे पिछाडावरी आहेत. दरम्यान, परळीत मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल असून. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.प्रत्येक मतमोजणी टेबलवर चार अधिकारी व कर्मचारी नियुक्त असून असे एकूण ५६ अधिकारी कर्मचारी हे काम पाहत आहेत. परळी मतदारसंघातील अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्या फेरीत धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभेत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात लढत होवून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा ३० हजार ७०१ मतांनी पराभव केला होता. यावेळी ३ लाख ६ हजार ७१० मतदारापैकी २ लाख २४ हजार २७२ मतदारांनी हक्क बजावत ७३ टक्के मतदान झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांना १ लाख २२ हजार ११४ मतदान तर पंकजा मुंडे यांना ९१ हजार ४१३ मतदान पडले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ५ टक्के मतदान जास्त झाले असून यावेळी मुंडे परिवार एकत्र आहे. यामुळे निकाल काय लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडे यांच्या जमेच्या बाजू :
गेल्या बावीस वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य ते कृषी मंत्री या पदाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघात कार्यकर्ते, मतदारांशी असलेला थेट संपर्क, केलेली विकासाची कामे, लोकांचे सोडविलेलेलेले प्रश्न तसेच त्यांची प्रचाराची व कामाची यंत्रणा चांगली होती. ओबीसी समाज धनंजय मुंडे यांच्या बाजूने एकवटला गेला. तसेच भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची साथ धनंजय मुंडे यांना मिळाली आहे.
राजेसाहेब देशमुख यांच्या जमेच्या बाजू :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांची साथ, महाविकास आघाडीच्या परळीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले काम. मराठा चेहरा म्हणून राजकीय क्षेत्रात परळी मतदारसंघात आलेले महत्व. बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापतीपद भूषविल्यामुळे मतदारांशी जवळून संपर्क.