सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:12 PM2021-03-20T16:12:44+5:302021-03-20T16:15:18+5:30
Supriya Sule / Amol Kolhe : प्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिनच्या वतीनं देण्यात आला पुरस्कार
प्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिन यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात या पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला. सुप्रिया सुळे यांना १६ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संसद महारत्न आणि १७ व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूट क्लब सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांचा गौरव करण्यात आला.
"पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मला उपस्थित राहता आले नाही. केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यानंतर दिली. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत मला सातत्याने आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. प्रांजळपणाने नमूद करावेसे वाटते की, आपला विश्वास हीच माझ्यासाठी खरी उर्जा आहे. यामुळेच जनहिताच्या मुद्यांना संसदेत मांडता आल्याचंही त्यांनी ट्विटरवरून व्हिडीओद्वारे सांगितलं.
प्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिन यांच्या वतीने मला १६ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संसद महारत्न व १७ व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार जाहिर झाला. हे दोन्ही पुरस्कार दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूट क्लब सभागृहात आज प्रदान केले गेले. pic.twitter.com/J4g4c5v8LZ
— Supriya Sule (@supriya_sule) March 20, 2021
काय म्हणाले अमोल कोल्हे?
"माझ्यासारख्या नवख्या खासदाराला पदार्पणातच सभागृहात सर्वाधिक प्रश्न उपस्थित करुन जनहिताच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा महान विभूतींच्या विचारांचा वारसा माझ्यासमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक खा. शरद पवार यांचे आशीर्वाद पाठिशी आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन लाभते," असं कोल्हे यावेळी म्हणाले.
"राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय आमदार व लोकप्रतिनिधी, संसदेतील ज्येष्ठ सहकाऱ्यांची खंबीर साथ व सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरीकाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची जाणीव यामुळे हे शक्य होऊ शकलं. कारण आपला विश्वास हीच माझी ऊर्जा आहे. म्हणूनच हा संसदरत्न पुरस्कार आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकास अतिशय कृतज्ञतापूर्वक अर्पण करीत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.