दुष्काळाऐवजी संसदीय समितीचे साईदर्शन!

By admin | Published: April 21, 2017 03:57 AM2017-04-21T03:57:43+5:302017-04-21T03:57:43+5:30

दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून नगरमध्ये धडकलेल्या १३ खासदारांच्या संसदीय समितीने गुरुवारी

Parliamentary panel drought instead of drought! | दुष्काळाऐवजी संसदीय समितीचे साईदर्शन!

दुष्काळाऐवजी संसदीय समितीचे साईदर्शन!

Next

रियाज सय्यद, कोपरगाव
(जि. अहमदनगर)
दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून नगरमध्ये धडकलेल्या १३ खासदारांच्या संसदीय समितीने गुरुवारी सहपरिवार केवळ साईदर्शन करण्यातच धन्यता मानली. समितीमधील एकही खासदार दुष्काळी गावाकडे फिरकला नाहीच, शिवाय आदर्श गावाच्या दिशेने पावले टाकणाऱ्या डाऊच बुद्रूककडेही त्यांनी पाठ फिरवली. समितीच्या या असंवेदनशील कारभारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खासदार डॉ. पी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती कोपरगाव तालुक्यात आली होती. समितीत खासदार प्रल्हाद सिंग पटेल, डॉ. यशवंत सिंग, लाडुकिशोर स्वाईन, समशेरसिंग डुल्लो, महेंद्रसिंग माहरा, शिवप्रताप शुक्ला, नारायणलाल पंचारिया, विजयकुमार हंसदक, जुगलकिशोर शर्मा, संजय धोत्रे, चिंतामण वनगा, ए. के. साल्वाराज या खासदारांसह लोकसभेचे सहसचिव अभिजित कुमार, अहवाल अधिकारी सतीश कुमार, हिमांशू गौर, व्ही. श्रीनिवासन यांचा समावेश होता. पाच खासदार सहपरिवार होते.
दुष्काळी भागातील गावांमधील विकासकामांची पाहणी करून केंद्राला अहवाल सादर केला जाणार आहे. त्या अनुषंगाने समिती तालुक्यातील संवत्सर व डाऊच बुद्रूक या दोन गावांना भेटी देणार असल्याचे प्रशासनास बुधवारी रात्री कळविण्यात आले होते. समिती येणार असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही जय्यत तयारी केली होती. मात्र सर्वांचा हिरमोड झाला.

शेतकरी संतापले
समितीने गुरुवारी सकाळी
९ वाजता संवत्सर गावातील गणेश बंधारा व विहिरीची पाहणी केली. त्यानंतर पूर्व नियोजनानुसार समिती डाऊच बुद्रूकमधील कामांची पाहणी करणार होती. मात्र समितीचा लवाजमा थेट शिर्डीस गेला. सोपविलेली जबाबदारी टाळून सार्इंच्या चरणी लीन झाला. या प्रकाराने ग्रामस्थ संतापले. अधिकाऱ्यांनाही दिवसभर उन्हात ताटकळावे लागले. देवदर्शनच घ्यायचे होते, तर मग सरकारी दौऱ्याचा खर्च कशासाठी, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.


महाराष्ट्रीय खासदारांना भुरळ
विशेष म्हणजे, संसदीय समितीत संजय धोत्रे व चिंतामण वनगा या दोन महाराष्ट्रीय खासदारांचा समावेश होता. समितीच्या दिमतीला सरकारी लवाजमा असल्याने खासदारांना देखील ‘व्हीआयपी’ दौऱ्याची भुरळ पडली होती.

Web Title: Parliamentary panel drought instead of drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.