पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:27 PM2021-09-13T23:27:48+5:302021-09-13T23:28:10+5:30
ज्योती देवरेंच्या तक्रारीत तथ्य न आढळल्यानं बदली
अहमदनगर: लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार करून आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली करण्यात आली. देवरे यांनी महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचा अहवाल समितीनं दिला. तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यानं त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला.
गेल्या महिन्यात देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यामध्ये होता. या प्रकाराला पुढे राजकीय वळणदेखील मिळालं. महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचा आदेश देण्यात आला. त्यासाठी महिला अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली.
तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध काही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. देवरे यांच्याविरुद्धच्या चौकशीचा अहवाल आधीच आला आहे. त्यामध्ये देवरे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर महिला आयोगाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीचा अहवालही आता प्राप्त झाला असून देवरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचं त्यात म्हटलं आहे.
सरकारचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी सरकारच्या वतीनं देवरे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. देवरे यांची पारनेरहून जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आलेलं नाही. मात्र, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानं त्यांची बदली करण्यात येत आहे. हा आदेशच त्यांचा कार्यमुक्ती आदेश समजावा, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पारनेरला अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली करण्यात आल्याचे समजते
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 13, 2021
जाहिर निषेध आहे या महाविकास आघाडी सरकारचा
हे सरकार लोकधार्जीणे नाही तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bb_thorat@Dev_Fadnavis@ChDadaPatil@mipravindarekarpic.twitter.com/z7wqocVJ5Y
हे तर आमदार, मंत्री, बगलबच्चे धार्जिणे सरकार- चित्रा वाघ
ज्योती देवरेंच्या बदलीवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार लोकधार्जीणे नाही तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो, असं वाघ म्हणाल्या. देवरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाघ यांनी त्यांची भेट घेतली होती.