पडसलगीकर आज स्वीकारणार सूत्रे
By admin | Published: January 31, 2016 03:19 AM2016-01-31T03:19:35+5:302016-01-31T03:19:35+5:30
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर मावळते आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून रविवारी दुपारी पदाची सूत्रे स्वीकारतील. पडसलगीकर यांच्यासाठी
- डिप्पी वांकाणी, मुंबई
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर मावळते आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून रविवारी दुपारी पदाची सूत्रे स्वीकारतील. पडसलगीकर यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुंबई पोलीस आयुक्तपदाचा दर्जा अवनत करून, पूर्वीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा केला. शनिवारी तसे आदेश जारी करण्यात आले. पडसलगीकर यांना पदोन्नती मिळाल्यानंतर या पदाचा दर्जा पुन्हा वाढविण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबईचे पोलीस आयुक्तपद नेहमीच अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राहिले आहे. मात्र, अहमद जावेद यांना सामावून घेता यावे, यासाठी गेल्या वर्षी दर्जा वाढवून ते पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले होते. जावेद अहमद हे आधीच पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी होते. त्यांना कमी दर्जाच्या पदावर नियुक्त करता येत नसल्यामुळे पदाचा दर्जा वाढविण्यात आला होता. जावेद अहमद यांच्यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्तपद राकेश मारिया यांच्याकडे होते. मात्र, नियोजित पदोन्नतीच्या २२ दिवस आधीच मारियांना पदोन्नती देत, त्यांची बदली करण्यात आली. यावरून वादही निर्माण झाला होता.
पडसलगीकर यांच्या नियुक्ती आदेशात पुढील आदेशापर्यंत हे पद अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राहील, असे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८२ च्या तुकडीचे अधिकारी असलेले पडसलीकर यांची पदोन्नती प्रस्तावित आहे. मात्र, खात्याच्या पदोन्नती समितीची (डीपीसी) याबाबत बैठक अद्याप व्हायची आहे. जावेद यांच्या निवृत्तीमुळे पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या पाचवर आली आहे. डीपीसीची बैठक होऊन पडसलगीकर यांना लगेचच पदोन्नती दिली जाईल किंवा मग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विजय कांबळे पुढील महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पदोन्नती मिळेल. पडसलगीकर हे सर्वात ज्येष्ठ अतिरिक्त पोलीस महासंचालक असल्यामुळे त्यांना पदोन्नती दिली जाईल आणि त्यांच्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा दर्जा पुन्हा वाढविला जाण्याची शक्यता आहे, असे पोलीस खात्यातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलीस दलाच्या वतीने शनिवारी नायगाव पोलीस मैदानावर जावेद अहमद यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जावेद यांनी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक मिळालेल्या मुंबईच्या १३ पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले, तसेच आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल पोलीस दलाचे आभार मानले.
मुंबईसाठी काय?
पडसलगीकर हे मूळचे सोलापूरचे रहिवासी असून, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. एक टास्क मास्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खरे तर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांनाच मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यास इच्छुक होते. मात्र, पडसलगीकर यांनी विनम्रपणे त्यांची विनंती नाकारली होती आणि राकेश मारिया यांना आयुक्त म्हणून कायम ठेवावे, असे त्यांना सांगितले होते.
ते आयबीमध्ये दहशतवादविरोधी पथकात सक्रिय होते. त्यांचा तो अनुभव मुंबई पोलिसांना चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. नव्वदीच्या दशकात त्यांनी गुन्हे शाखेत उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे मुंबईचे गुन्हेगारी जगत त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या रूपाने ९ वर्षांनंतर मुंबईला एक महाराष्ट्रीय पोलीस आयुक्त मिळाला आहे. यापूर्वी डी.एन. जाधव यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.