कल्याणला इमारतीचा भाग कोसळला

By admin | Published: June 28, 2016 02:55 AM2016-06-28T02:55:13+5:302016-06-28T02:55:13+5:30

पूर्वेतील कर्पेवाडीतील ‘जाधव निवास’ या अतिधोकादायक इमारतीचे छत आणि जिन्याचा भाग रविवारी रात्री उशिरा कोसळला.

The part of the building collapsed in Kalyan | कल्याणला इमारतीचा भाग कोसळला

कल्याणला इमारतीचा भाग कोसळला

Next


कल्याण : पूर्वेतील कर्पेवाडीतील ‘जाधव निवास’ या अतिधोकादायक इमारतीचे छत आणि जिन्याचा भाग रविवारी रात्री उशिरा कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तळ अधिक एक मजली आरसीसी प्रकाराची ही इमारत महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली होती. त्यामुळे एक कुटुंब वगळता इतर रहिवाशांनी इमारत रिकामी केली होती. दरम्यान, त्या कुटुंबाला स्थलांतरित करून महापालिकेने सोमवारी इमारत जमीनदोस्त केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नुकतीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, ३५७ इमारती धोकादायक तर २७९ अतिधोकादायक आहेत. महापालिका दरवर्षी अशा इमारतींना नोटीस बजावत त्या तोडण्याचे आदेश देते. मात्र, त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाच्या ठोस अंमलबजावणीअभावी धोकादायक बांधकामांचा प्रश्न ‘जैसे थे’ असताना दुसरीकडे रहिवासीही इमारत धोकादायक ठरवल्यानंतर ती रिकामी करत नाहीत. त्यामुळेही कारवाईत अनेकदा अडथळे येतात.
दरम्यान, पावसाळा सुरू होण्यापूर्वी कल्याण पश्चिमेतील जोशी बाग परिसरातील धोकादायक बांधकाम कोसळल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
(प्रतिनिधी)
तीनदा नोटीस : महापालिकेने ३९ वर्षे जुन्या ‘जाधव निवास’ इमारतीला तीनदा धोकदायकची नोटीस बजावली होती. त्यामुळे रहिवाशांनी ही इमारत रिकामी केली होती. तेथे फक्त शरद काळे यांचे कुटुंब राहत होते. इमारतीच्या जिन्याचा आणि छताचा भाग कोसळल्यानंतर त्यांचे सुखरूपपणे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले. महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाने सोमवारी ती जीर्ण इमारत जमीनदोस्त केली.

Web Title: The part of the building collapsed in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.