पार्थ, आदित्य ठाकरेंच्या 'त्या' फोटोंवरून शिवसेना-राष्ट्रवादीत सोशल 'वॉर'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 05:17 PM2019-04-26T17:17:26+5:302019-04-26T17:41:46+5:30
शिवसेनेकडून पार्थ पवार यांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. महाराष्ट्रातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. या टप्प्यात १७ मतदार संघात मतदान होणार असून मावळ मतदार संघाचा देखील यामध्ये समावेश आहे. मावळमधून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे पार्थ यांच्यासमोर आव्हान आहे. मात्र ही लढत सोशल मीडियावर एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आली आहे.
शिवसेनेकडून पार्थ पवार यांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांचे काही फोटो शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील सोशल वॉर विकोपाला जात असल्याचे असल्याचे चित्र आहे. यातून पार्थ आणि आदित्य ठाकरे यांची प्रतिमा खराब करण्याचा उठाठेव सुरू आहे.
दरम्यान पार्थ पवार तरुण उमेदवार असून परदेशात शिकलेले आहेत. त्यामुळे मैत्रिणी असणे किंवा पबमध्ये फोटो काढणे ही सामान्य बाब आहे. अगदी हेच आदित्य ठाकरे यांना देखील लागू होते. आदित्य ठाकरे यांचे देखील बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत फोटो आहेत. मात्र दोन्ही युवा नेत्यांचे जुने फोटो बाहेर काढून उभय पक्षांकडून निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात करण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा जसजसा जवळ येत आहे, तसतसा निवडणूक प्रचाराचा स्तर घसरत चालल्याचे दिसून येत आहे.