पार्थ पवारांच्या ‘जय श्रीराम’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:21 AM2020-08-11T07:21:26+5:302020-08-11T08:03:43+5:30
राष्ट्रवादीत अस्वस्थता असून पक्षाची वैचारिक कोंडी झाल्याने कार्यकर्तेही संभ्रमात
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत आयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामास शुभेच्छा देणारे खुले पत्र लिहिल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता असून पक्षाची वैचारिक कोंडी झाल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
पार्थ पवार यांनी दुसऱ्यांदा पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करून पार्थ यांनी पहिल्यांदा पक्षाला अडचणीत टाकले. तर आता राम मंदिरासंदर्भात ‘वेगळी’ भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरल्यानंतर, ‘मंदिर उभारल्याने कोरोना जाईल असे काहींना वाटते’ अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी भूमिपूजनाचा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचा सल्ला दिला होता.
पार्थ यांनी आपल्या खुल्या पत्रात, ‘आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत. राम जन्मभूमी प्रकरणातून आणखी एक मोठा धडा आपण शिकला पाहिजे. विजयात आपण विनम्र असले पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
‘ती’ वैयक्तिक भूमिका
खा. सुप्रिया सुळे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत पार्थची ती वैयक्तिक भूमिका आहे, असे सांगून पक्षाला पार्थपासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.