औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 09:41 PM2021-03-07T21:41:28+5:302021-03-07T21:44:56+5:30
Aurangabad Lockdown : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय. शनिवार आणि रविवारी १०० टक्के लॉकडाऊन
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या ११ मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. औरंगाबादमधील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा याकाळात बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच या कालावधीमध्ये आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असलं तरी या कालावधीत वैद्यकीय सेवा, माध्यमांची कार्यालये, दुध विक्री, भाजीपाला आणि फळविक्री सुरू ठेवण्यात येणार आहे. "गर्दी टाळता येईल आणि अनावश्यक गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगानं वाढतोय त्याला आळा घालता येईल अशा प्रकारचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. संपूर्ण शहरात मास्कचा वापर केला गेला पाहिजे, सुरक्षित अंतरही ठेवलं पाहिजे या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात आलं आहे. सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे," असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
Night restrictions (9 pm- 6 am) to be imposed in Sambhajinagar (Aurangabad) amid rising #COVID19 cases from March 11 to April 4. Full lockdown on weekends. During this period, schools, colleges, wedding halls to remain closed: Maharashtra Minister Eknath Shinde pic.twitter.com/5NMJpBQHdR
— ANI (@ANI) March 7, 2021
"नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला तरच जे काही शासन, स्थानिक प्रशासन उपाययोजना करत आहे त्याचा परिणाम दिसून येईल. आज मंत्रिमंडळातही कोरोनावर सादरीकरण झालं. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. तसंच अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, सर्वांनी मास्क वापरलं पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवलं पाहिज अशा सूचनाही त्यांनी केल्या. शासन आणि स्थानिक प्रशासनानंदेखील याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. परंतु नागरिकांचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू नये अशी चिंतादेखील बैठकीत व्यक्त करण्यात आली," असंही त्यांनी नमूद केलं.
शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाऊन
औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. तसंच या कालावधीत विवाह सोहळे रद्द करण्याचे आदेश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. दर शनिवारी आणि रविवारी आवश्यक सेवा वगळता १०० टक्के लॉकडाऊन असणार आहे. याव्यतिरिक्त जाधवमंडी बुधवार पासून बंद राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.