व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना मुभा
By admin | Published: June 10, 2016 01:07 AM2016-06-10T01:07:34+5:302016-06-10T01:07:34+5:30
नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेमवर्कवर (एनएसक्यूएफ) आधारित राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत सुरू
पुणे : नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेमवर्कवर (एनएसक्यूएफ) आधारित राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या व्यावसाय शिक्षण लेव्हल ३ निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी आॅनलाईन प्रवेश पध्दतीने सर्व शाखांमध्ये अर्ज करता येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला असला तरी मान्यता असलेल्या शहरातील ५ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षणचे विषय शिकविण्याची मुभा त्यांना राहणार आहे. शिक्षण विभागाने प्रथमच या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात व्यवसाय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच विशेष सुविधा देण्यात आली आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत एनएसक्यूएफवर आधारित व्यावसाय शिक्षण माध्यमिक स्तर या योजनेमध्ये राज्यातील २०१४-१५ पासून व्यावसाय शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांवर सुरू करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ दिला जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या ५ उच्च माध्यमिक शाळांमध्ये एनएसक्यूएफनुसार मल्टी स्किल व रिटेल हे व्यवसाय शिक्षणाचे विषय इयत्ता अकरावी व बारावी करिता लेव्हल ३ व ४ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इयत्ता दहावीमध्ये मल्टी स्किल, रिटेल व आॅटो लेवल २ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना लेवल ३ व ४ चे शिक्षण घेता येणार आहे.
पुणे विभागाच्या सहायक संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, व्यवसाय लेवल ३ निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेच्या महाविद्यालयामध्ये अर्ज करता येईल. त्यांना अकरावी प्रवेशाबरोबरच मान्यता असलेल्या माध्यमिक शाळांममधून शिक्षण घेण्याची संधी असेल. येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र विद्यालय, बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगळवार पेठेतील बाबूजीराव सणस कन्याशाळा, भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळा, शिवाजीनगर येथील हुतात्मा बालवीर विद्यालय, शिरीषकुमार विद्यालय या मान्यता असलेल्या माध्यमिक शाळेतून विद्यार्थ्यांना व्यवसाय विषय शिकण्याची मुभा असेल.