दुष्काळ निवारण लढ्यात सहभागी व्हा
By admin | Published: March 17, 2016 04:04 AM2016-03-17T04:04:22+5:302016-03-17T04:04:22+5:30
पाण्याचे संवर्धन, पुनर्भरण, पुनर्वापरातूनच दुष्काळावर मात शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या मोहिमेत आणि दुष्काळ निवारणाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन
मुख्यमंत्र्यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन; ‘लोकमत’चा विशेष सहभाग
मुंबई : पाण्याचे संवर्धन, पुनर्भरण, पुनर्वापरातूनच दुष्काळावर मात शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या मोहिमेत आणि दुष्काळ निवारणाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘जलजागृती’ सप्ताहाचा प्रारंभ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या निमित्ताने दुष्काळाची भीषणता आणि पाण्याचे महत्त्व विशद करणारे अत्यंत बोलक्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या राज्यभरातील छायाचित्रकारांच्या चित्रांचा यात समावेश आहे. ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी ‘लोकमत’ने घेतलेल्या या पुढाकाराबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पाण्याचे दुर्भिक्ष्य हा गावागावात चिंतेचा, वादाचा विषय झाला आहे. त्यामुळे आताच पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ते पुढील पिढीसाठी घातक ठरेल. जलप्रदूषण हाही चिंतेचा विषय आहे. सांडपाणी नद्यांत सोडणे, घनकचरा साठून राहणे, अतिक्रमण यामुळे जलस्रोत प्रदूषित होतात. त्यामुळेच शासनाने स्वच्छता अभियानात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावर विशेष भर दिला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्याचाही प्रयत्न होत आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. जलसंपदामंत्री महाजन प्रास्ताविकात म्हणाले की, ‘पाण्याचे नैसिर्गक स्रोत कोरडे झाले आहेत. शेती, उद्योगासह पेयजलासाठी पाणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे ही वेळ आली आहे.’ कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या
पाण्याचे पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)
लोकमतचा सहभाग
‘लोकमत’च्या राज्यातील छायाचित्रकारांनी दुष्काळाची भीषणता आणि पाण्याचे महत्त्व या विषयावर
काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
होळीला पाण्याचा गैरवापर टाळा
होळी हा आपला महत्त्वाचा सण आहे. सर्वांनी तो आनंदाने साजरा करायचा आहे. तथापि, पाण्याची उधळपट्टी होता कामा नये. पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. कोरडी होळी खेळावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.